नाशिक : रामसेतू तोडण्याच्या हालचाली ; स्थानिकांचा विरोध | पुढारी

नाशिक : रामसेतू तोडण्याच्या हालचाली ; स्थानिकांचा विरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : गोदावरी नदीवरील पंचवटी व नाशिक शहराला जोडणारा ऐतिहासिक रामसेतू पूल आहे. हाच रामसेतू तोडण्याच्या हालचाली स्मार्ट सिटीचे अधिकारी करीत आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नारोशंकर मंदिराजवळील दोन सांडवे तोडण्यात आल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी रामसेतूची मदत घ्यावी लागत आहे. रामसेतू तोडला तर नाशिक व पंचवटीतील रहिवाशांना जाण्या-येण्यासाठी प्रचंड अडचणीचे ठरणार आहे. तरी रामसेतू तोडण्यास रामसेतू बचाव अभियानाच्या अध्यक्षा कल्पना पांडे यांनी विरोध केला आहे.

रामसेतूवरून शेकडो वेळा गोदावरीच्या पुराचे पाणी गेले असतानाही रामसेतू तसाच आहे. स्मार्ट सिटीच्या विकासाबाबत सुसूत्रता नाही. कारण नसताना रस्ते खोदायचे. ते दोन-तीन महिने तशाच अवस्थेत ठेवायचे. त्या खड्ड्याला बुजविण्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा पदरात पाडून घ्यायचा हेच यामागील उद्देश आहे.

त्यामुळे रामसेतू तोडून नागरिकांचे पुन्हा एकदा हाल करू नका. यामुळे शेकडो कुटुंबे उदरनिर्वाहावाचून वंचित राहतील. जाण्या-येण्याचा प्रश्न निर्माण होईल. रामसेतू बचाव अभियान यशस्वी होण्यासाठी नाशिक शहरातील नागरिकांची सह्यांची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. रामसेतू बचाव अभियानास स्थानिकांचा पाठिंबा असल्याचेही पांडे यांनी सांगितले. यावेळी सुनंदा जगताप, स्वप्नील आहेर, सचिन खिंडारे, संदीप बोरकर, सुभाष पोतदार, संजय वाली, पार्वती गोसावी आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button