एकनाथ खडसे म्हणाले, “महाविकास आघाडीचं सरकार पाडलं तरी…” | पुढारी

एकनाथ खडसे म्हणाले, "महाविकास आघाडीचं सरकार पाडलं तरी..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : १० मार्चला राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता जाईल, असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले की, “चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्यानं अस्वस्थ झालेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारची टीका करत आहेत”.

चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच एक विधान केलं होतं की, “राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत. आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल”, असंही पाटील यांनी म्हटलं होतं.

त्यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, “चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार असून, महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी त्यांनी अनेकवेळा तारखा जाहीर केल्यात. मात्र चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांना वणवण फिरावे लागत असल्याने, ते अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत.”

“बहुमतापेक्षाही कितीतरी अधिक आमदार महाविकास आघाडीकडे आहेत. सरकार पाडायचा विचार केला आणि दुर्दैवाने सरकार पाडलं तरी बहुमताच्या जोरावर परत हेच सरकार येणार आहे. सरकार पडायला ठोस कारण असला पाहिजे. विरोधक मनाचे मांडे खात असून जोपर्यंत तिन्ही पक्षाचे बहुमत आहे तोपर्यंत हे सरकार पडू शकत नाही”, असा विश्वासही एकनाथ खडसेंनी व्यक्त केला.

हेही वाचलं का? 

Back to top button