शिराळा : बिबट्या आणि गव्यांची दहशत! | पुढारी

शिराळा : बिबट्या आणि गव्यांची दहशत!

शिराळा : विठ्ठल नलवडे

चांदोली अभयारण्यातील अन्न साखळी कमकुवत झाली असून बिबटे अन्नाच्या शोधासाठी जंगलाबाहेर पडले आहेत. त्यामुळे जंगलातील अन्नसाखळी वाढवण्याची गरज आहे. शिराळा तालुक्याबरोबर वाळवा तालुक्यात बिबट्याच्या धुमाकूळ सुरू असून बिबट्याच्या हल्लाचे सत्र सुरू आहे. दररोज बिबट्याचा हल्ला, दर्शन होत असल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील 92 गावांत बिबट्यांचा हल्ला तर गव्यांचा उपद्रव सुरू आहे.

तालुक्यात एका वर्षात 107 पशुधनावर बिबट्याने हल्ला केला आहे. तर बिबट्याच्या हल्लात 22 फेब्रुवारी 2021 रोजी एका ऊसतोडणी मजुराचा एक वर्षाचा मुलगा मृत्युमुखी पडला आहे. 28 ऑगस्टला कार्वे येथील शेतकर्‍याची गाय मारली. डिसेंबर 21 मध्ये कापरी येथील सुभाष तांदळे यांच्या 24 मेंढ्या तर मरळनाथपूर येथील सतीश थोरात यांच्या 11 मेंढ्या बिबट्यांच्या हल्लात मरण पावल्या.
जिल्ह्यात सध्या बिबटे, गवे, मगर, लांडगे, तरस, हरणे, रानडुक्कर या हिंस्र प्राण्यांचे दर्शन आणि वावर नित्याचाच झाला आहे.

अभयारण्यातील गवेही आता बाहेर पडले आहेत. 2016 मध्ये गव्याच्या हल्लात काळुंद्रे येथील संभाजी उबाळे हा तरूण मृत्यूमुखी पडला आहे. गव्यांमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. चांदोली अभयारण्याला कंपाऊंड करावे, ही मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून अभयारण्यालगतच्या गावातील लोकांनी केली आहे.

गवे आणि बिबट्यांच्या वाढत्या हल्यामुळे आता गरज निर्माण झाली आहे. जंगलातून बाहेर पडलेल्या या वन्यप्राण्यांना पकडून जंगलात सोडण्याची कोणतीच यंत्रणा व प्रशिक्षित मनुष्यबळ सध्यातरी वन विभागाकडे नाही. या प्राण्यांना पकडण्याचे अधिकारही येथील विभागाला नाहीत. त्याची परवानही त्यांना नागपूरहून घ्यावी लागते. त्या परिसराला भेट देऊन पाहणी करणे व लोकांना प्रबोधन करणे या पलीकडे स्थानिक वनाधिकारी व कर्मचार्‍यांना कोणतेच अधिकार नाहीत . शिराळा तालुक्यातील 92 गावांतील लोकवस्तीत वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. जंगलाबाहेर वावरणार्‍या या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्यास वन विभागाचे हात किचकट कायद्यांमुळे बांधले आहेत.

बिबट्याच्या पासून बचाव करण्यासाठी वनखात्याने जन जागृती मोहिम राबविण्यात आली असून तालुक्यातील 400 ऊस तोडणी टोळ्याशी संपर्क साधून खबरदारी कशी घ्यावी हे सांगीतले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीना, कारखाना यांना बिबट्याच्या पासून काय खबरदारीची पत्रे दिली आहे वनखात्या मार्फत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. माहिती पट दाखवण्यात आले आहेत.बिबट्यांच्या हल्लात मयत झाले त्याचे त्वरित पंचनामे करून मदत देण्यात आली आहे.
– सचिन जाधव, शिराळा वनक्षेत्रपाल

बिबट्याच्या हल्लाचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त वनखात्याने करावा. शेतकरी रात्री उसाला पाणी पाजण्यासाठी जातात वीज वितरण कंपनीने दिवसा लाईट सुरू ठेवावी. बिबट्याचे हल्ले होणार नाहीत. वनखात्याने कर्मचारी गस्ती साठी ठेवावे. बिबटे पकडण्यासाठी सापळे, यंत्रणा लावावी.
– अमृत पाटील, तडवळे सरपंच,

Back to top button