

धुळे पुढारी वृत्तसेवा : रस्ता लूट करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकाने गजाआड केले आहे. या गुन्हेगारांकडून आणखीही गुन्ह्याची माहिती मिळण्याची शक्यता पोलिस प्रशासनाने व्यक्त केली आहे.
दोंडाईचा येथे राहणारे फिल्ड ऑफिसर धनंजय भीमराव गोखले यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. मांडळ गावातील बचत गटांच्या सभासदांकडून एक लाख 84 हजार तीनशे रुपये घेऊन गोखले हे दोंडाईचाकडे येत असताना एका पल्सर मोटारसायकलवरून तीन युवकांनी येऊन त्यांना थांबवले. यातील एका युवकाने रक्कम आणि मोबाईल असलेली बॅग हिसकावून घेतली. यानंतर चोरट्यानी पलायन केले. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या माध्यमातून सुरू असतानाच या पथकाला गुप्त माहिती मिळाली.
हा गुन्हा धुळे शहरातील वाडीभोकर रोडवर राहणारे सुरेश गुलाब भिल व शाम गोपीचंद बागुल या दोघांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकाने वाडीभोकर रोडवर राहणाऱ्या या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता सुरेश भिल, श्याम बागुल यांच्या समवेत सुमित गायकवाड व अन्य दोघे देखील सहभागी असल्याची माहिती मिळाली. या आरोपींचा शोध घेतला असता श्याम बागुल सुमित गायकवाड हे मिळून आले. त्यांनादेखील ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली.
या गुन्ह्यांमध्ये दोंडाईचा नजीकच्या मांडळ गावात राहणारा विशाल जिभाऊ ठाकरे याने धनंजय गोखले हे बचत गटाचे पैसे घेण्यासाठी येत असल्याची माहिती पुरवल्याची बाब तपासात पुढे आली आहे. या सर्व आरोपींकडून 65 हजार रुपयांची रोकड, चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी, वीस हजार रुपये किमतीचे चार मोबाईल आणि पाचशे रुपये किमतीचे फिंगरप्रिंट स्कॅनर असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रस्ता लूट करणाऱ्या या आरोपींनी याच भागांमध्ये आणखी गुन्हे केल्याची शक्यता असून चौकशीतून हा प्रकार उघड होणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.