कोरोना काळातही स्टार्टअप्समध्ये भारत जागतिक स्तरावर टॉप-३ मध्ये : पंतप्रधान मोदी | पुढारी

कोरोना काळातही स्टार्टअप्समध्ये भारत जागतिक स्तरावर टॉप-३ मध्ये : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

कोविडच्या काळातही आपल्या देशातील तरुणांनी जागतिक स्तरावर स्टार्टअप्सच्या संख्येच्या बाबतीत भारताला टॉप-३ मध्ये नेले आहे. कोविड महामारी दरम्यान जगभरातील १५० देशांना मदत करुन भारताने ली़डरशीपची भूमिका घेतली आणि जगाने आमच्या या भूमिकेचे कौतुक केले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना केले.

कोरोना पूर्व काळाच्या तुलनेत लॉकडाऊननंतर नोकरभरतीत दुपटीने वाढ झाली आहे. नॅसकॉमच्या (NASSCOM) अहवालात हे अधोरेखित करण्यात आले आहे. अलिकडील काही वर्षांत सुमारे २७ लाख लोकांना आयटी क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्या आहेत. हा एक नवीन उच्चांक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

जेव्हा कोविड महामारी सुरु झाली तेव्हा भारताचे काय होणार यावर चर्चा झाली. भारतामुळे जगावर काय परिणाम होणार यावरही चर्चा झाली. मात्र देशातील १३० कोटी जनतेची इच्छाशक्ती आणि शिस्तीमुळे भारताच्या या प्रयत्नांचे जगभरातून कौतुक होत आहे. कोविड १९ ही महामारी आहे आणि मानवजातीने गेल्या १०० वर्षांत असे संकट कधीच पाहिले नव्हते. हे संकट त्याचे स्वरूप बदलून लोकांसाठी संकट निर्माण करते. संपूर्ण देश आणि जग त्याच्याशी लढत आहे.

PLI योजनेच्या माध्यमातून भारत हा आघाडीच्या मोबाईल उत्पादकांपैकी एक बनला आहे. निर्यातीतही त्याचा सहभाग वाढत आहे. पीएलआय योजनेचा ऑटोमोबाईल आणि बॅटरी क्षेत्रालाही चांगला फायदा होत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

अर्थव्यवस्थेत जितकी वृद्धी होईल तितक्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील. गेल्या ७ वर्षांत आमचा यावरच फोकस राहिला आहे. आज जगातील आर्थिक तज्ज्ञांनी मान्य केले आहे की, भारताने ज्या आर्थिक धोरणांसह कोरोनाच्या काळात स्वत:ला पुढे नेले तेच एक उदाहरण आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

पंतप्रधान मोदींचा पुन्हा काँग्रेसवर हल्लाबोल

भारत ही लोकशाहीची जननी आहे. लोकशाही, वादविवाद भारतात शतकानुशतके चालू आहेत. पण काँग्रेसची अडचण ही आहे की त्यांनी घराणेशाहीशिवाय कधीही विचार केला नाही. भारतातील लोकशाहीला कुटुंबावर आधारित पक्षांचा सर्वात मोठा धोका आहे. हे आपल्याला मान्य करावे लागेल. जेव्हा कुटुंबाला कोणत्याही पक्षात सर्वोच्च स्थान असते, तेव्हा सर्वात पहिला आघात हा प्रतिभेवर होतो, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

Back to top button