येवला : पुढारी वृत्तसेवा : सुमारे एक महिन्यांपूर्वी तालुक्यातील बदापूर शिवारात वनविभागाने एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश मिळवले होते. मात्र या परिसरात अजून बिबट्या असल्याची शंका ग्रामस्थांना होती अखेर ही शंका खरी निघाली असून सुमारे एक महिन्यानंतर दुसरा बिबट्याही वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला आहे. वनविभागाच्या या यशस्वी कामगिरीमुळे बदापूरसह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
तालुक्यातील बदापुर शिवारात उसाचे क्षेत्र वाढल्याने, तसेच बागायती शेती क्षेत्रात वाढ झाल्याने जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. काही दिवसांपूर्वी बदापूर शिवारात पुन्हा बिबट्या दिसल्याची माहिती येवला वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार वन विभागाच्या वतीने शेतकरी नानासाहेब मोरे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजऱ्यामध्ये साधारण पंधरा ते अठरा महिन्याची मादी जातीचा बिबट्या जेर बंद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
येवला तालुक्यातील बदापुर व कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव हे दोन्ही गाव शेजारीच असून ऊस पिकाचे क्षेत्र वाढल्यामुळे या भागांत बिबट्यांचा वावर वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन येवला वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहेत्रे यांनी केले आहे.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.