नाशिकमध्ये प्लास्टिक राष्ट्रध्वज वापरावर बंदी ; प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय | पुढारी

नाशिकमध्ये प्लास्टिक राष्ट्रध्वज वापरावर बंदी ; प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येत्या 26 तारखेला प्रजासत्ताक दिन समारंभाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखावा यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 31 जानेवारीपर्यत प्लॅस्टिकचा वापर करून राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती, विक्री व वापरावर बंदी घालण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अपर जिल्हादंडाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिला आहे.

जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशात दरवर्षी प्रजासत्ताक दिन समारंभ राज्यभरात साजरा करण्यात येतो. राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे प्रत्येक नगारिकाचे आद्य कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा, यासंदर्भात शासनाने सुचना दिलेल्या आहेत. राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी तसेच विशेष कला-क्रीडाप्रसंगी वैयक्तिकरित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज नंतर अवमान होऊ नये म्हणून गृह मंत्रालयाने राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टीकच्या वापरास मान्यता दिलेली नाही. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोधचिन्हे व नांवे अधिनियम 1950 व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियमानुसार तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध असल्याचेही आदेशात नमुद आहे. त्याच अनुषंगाने प्रशासनाने आदेश काढत जिल्ह्यात महिना अखेरपर्यंत प्लास्टीकचा राष्ट्रध्वज निर्मिती, विक्री व वापरावर बंदी घातली आहे.

Back to top button