यूपीत प्रियांका गांधी-वधेराच काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा - पुढारी

यूपीत प्रियांका गांधी-वधेराच काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा

नवी दिल्ली ः जाल खंबाटा

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबतचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले, असे म्हणण्यास वाव आहे. दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात उत्तर प्रदेशातील युवकांसाठीच्या विशेष जाहीरनाम्याच्या प्रकाशनप्रसंगी याचे संकेत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा यांनी दिले.

पत्रकारांनी यूपीत काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण आहे, असे विचारताच, ‘उत्तर प्रदेशात काँग्रेसमध्ये तुम्हाला माझ्याशिवाय इतर कुणाचा चेहरा दिसतो आहे का? माझाच चेहरा ठिकठिकाणी दिसतो आहे. यूपीत काँग्रेस चांगली कामगिरी करेल. मुख्यमंत्रिपदाच्या चेहर्‍याबाबत म्हणाल, तर माझाच चेहरा सर्वाधिक पाहिला जात आहे, असे प्रियांका म्हणाल्या.

प्रियांका या उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीदेखील आहेत. त्या म्हणाल्या, पंजाबात नेते पक्षाला पुन्हाला सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. उत्तराखंडातही निकाल आमच्या बाजूने असतील. उत्तर प्रदेशात आमचे उमेदवार टक्‍कर देतील. त्यातून अनपेक्षित निकाल दिसून येतील.

प्रियांकांनी इतर पक्षांसोबत आघाडीचेही संकेत दिले आहेत. तसेच आघाडीबाबत बोलताना आमचा अजेंडा स्पष्ट असल्याचेही त्या म्हणाल्या.

20 लाख नोकर्‍यांचे आश्‍वासन

राज्य सरकारमध्ये 20 लाख नोकरभरतीचे आणि त्यातील 8 लाख नोकर्‍या युवतींसाठी असतील, असे आश्‍वासन काँग्रेसने युवा जाहीरनाम्यात दिले आहे. परीक्षार्थींना शुल्क माफी, परीक्षा केंद्रापर्यंत मोफत प्रवास, जॉब कॅलेंडर बनवून त्यात जाहिरात, परीक्षा, नियुक्‍ती अशा तारखा देण्यात येतील. त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, पोलिस अशा विभागांतील रिक्त पदांवर भरती अशी आश्‍वासने दिली आहेत.

Back to top button