भाजप सत्तेत येत नाही, लिहून देतो : संजय राऊत | पुढारी

भाजप सत्तेत येत नाही, लिहून देतो : संजय राऊत

पणजी ः पुढारी वृत्तसेवा

गोव्यात भाजप सत्तेत येत नाही, हे आपण लिहून देतो, असे शिवसेना खासदार तथा गोव्याचे पक्षाचे निवडणूक प्रमुख संजय राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी विधानसभा निवडणुकीसाठी नऊ उमेदवारांची घोषणा खा. राऊत यांनी केली. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, गोवा राज्य शिवसेना प्रमुख जितेश कामत उपस्थित होते.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांच्या उमेदवारीविषयी भाजप जर घराणेशाहीचा मुद्दा आडवा आणत असेल, तर आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे, महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या कुटुंबात प्रत्येकी दोन दोन उमेदवारी कशा काय देता? अशी विचारणा राऊत यांनी भाजपला केली.

काँग्रेसला असा दिलेला प्रस्ताव

राऊत म्हणाले, काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासमवेत युतीविषयी बोलणी केली होती. आम्ही त्यांना काँग्रेसने तीस जागा लढवाव्यात आणि दहा जागा शिवसेना-राष्ट्रवादी व गोवा फॉरवर्ड पक्ष वाटून घेतील, असा प्रस्ताव मांडला होता. परंतु त्यांना तो प्रस्ताव योग्य वाटला नाही.

आदित्य ठाकरे करणार गोव्यात प्रचार

गोव्यात शिवसेनेचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे येणार आहेत. शिवसेनेचे काही नेते देखील निवडणुकीसाठी गोव्यात तळ ठोकून असतील, असे राऊत यांनी सांगितले.

Back to top button