

मुंबई : संपूर्ण देशात विकासाची लाट असून महाराष्ट्रही गतीने विकसित होत आहे. आता उत्तर मुंबईला ‘उत्तम मुंबई’ करण्यासाठी आशीर्वाद द्या, अशी हाक केंद्रीय वाणिज्य मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी रविवारी मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील दहिसर (पूर्व) व कांदिवली (पूर्व) या दोन ठिकाणी झालेल्या जाहीर सभांमधून दिली.
मुंबई महापालिकेत तुमचा प्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची प्रभाग क्रमांक 03 चे महायुतीचे उमेदवार प्रकाश दरेकर आणि प्रभाग क्रमांक 26 च्या महायुतीच्या उमेदवार प्रीतम पंडागळे यांना द्या, असे आवाहनदेखील पीयूष गोयल यांनी केले.
प्रभाग क्रमांक 03 चे महायुतीचे उमेदवार प्रकाश दरेकर यांच्या प्रचारार्थ नॉर्दर्न हाईट्स, एस. व्ही. रोडच्या जवळ, संमेलन हॉटेलच्या शेजारी आणि दहिसर (पूर्व) येथे आणि प्रभाग क्रमांक 26 च्या महायुतीच्या उमेदवार प्रीतम पंडागळे यांच्या प्रचारार्थ संत निरंकार रोड, इंद्राजी डेअरी समोर, दामूनगर, कांदिवली (पूर्व) येथे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची जाहीर सभा झाली. याप्रसंगी भाजपा गटनेते व महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) आ. प्रवीण दरेकर, उत्तर प्रदेशच्या राज्यमंत्री अपर्णा यादव, भाजपचे उत्तर मुंबईतील माजी खासदार गोपाळ शेट्टी, प्रभाग क्रमांक 03 चे उमेदवार प्रकाश दरेकर, प्रभाग क्रमांक 26 च्या उमेदवार प्रीतम पंडागळे, शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, मंडल अध्यक्ष अमित उतेकर, मंडल अध्यक्ष अविनाश राय, सचिन नांदगावकर, राकेश चवाथे, ललित शुक्ला, दिनेश मिश्रा यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आपल्या भाषणात पीयूष गोयल म्हणाले, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. मला तुम्ही खासदार केले. विधानसभा निवडणुकीतही तुम्ही महायुतीला सत्ता दिली. आता मुंबई महापालिका निवडणुकीत देखील महायुतीचे नगरसेवक, नगरसेविकांना निवडून द्या. संपूर्ण मुंबईत भाजपा-शिवसेना-रिपाइं महायुतीची लाट आहे. ज्या प्रकारे विधानसभेत 288 पैकी 238 जागांवर प्रचंड विजय महायुतीला दिलात तसाच मोठा विजय मुंबई महापालिका निवडणुकीतही महायुतीला द्या, असे आवाहन गोयल यांनी केले.
केंद्रातील सरकारच्या माध्यमातून समस्या सोडविण्यासाठी मी आहे, असे सांगून गोयल म्हणाले, येथील रडारचे काम पूर्ण झाले. मागाठाणे, बोरिवली येथे चाळीत, झोपडपट्टीत राहणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल. झोपडपट्टीतील लोकांना नवे घर मिळाले. पूर्ण मुंबईत विशेषतः उत्तर मुंबईत एकही व्यक्ती पक्क्या घराशिवाय राहू देणार नाही. मुलांना चांगल्या शिक्षणासाठी चांगल्या शाळा देऊ. येथील नागरिकांनी स्वतःच्या इमारतीचा स्वयं पुनर्विकास करा आणि आपले घर बनवा. आमदार प्रवीण दरेकर या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे सर्वांना घर मिळेल असा विश्वासही खा. गोयल यांनी व्यक्त केला.
संजय गांधी नॅशनल पार्कमधील लोकांना पक्के घर देण्याची योजना असून, मागाठाणेत एक हजार बेडचे रुग्णालय उभारणार, कांदिवलीत कौशल्य विकास रोजगार केंद्र उभारले. पुढील केंद्र ठाकूर व्हिलेज येथे सुरु करणार आहोत. चांगले शिक्षण देण्यासाठी उत्तर मुंबईतील शाळांत आधुनिक शिक्षण पद्धत अवलंबणार असून या योजनांनी हा परिसराला उत्तम होईल, असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी आ. दरेकर यांनी सांगितले की, मुंबईचा चेहरा बदलण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. आज मुंबई बदलताना दिसते. मुंबईच्या प्रवेश द्वारावर असलेला आपल्या प्रभाग क्रमांक 3 चाही चेहरामोहरा बदलण्याचे काम प्रकाश दरेकर करणार आहेत. कांदिवली येथील सरोवा संकुलाचे कॉर्पसचे पैसे गेली अनेक वर्ष थांबले होते. पीयूष गोयल यांनी मनावर घेतले आणि 19 कोटीचा चेक समता नगरच्या सरोवा संकुलातील रहिवाशांना देण्यात आला. वन जमिनीवरील नागरिकांना मूलभूत सुविधा हव्या आहेत. पाणी, मीटर, शौचालय हवेय. केतकी पाडा आणि धारखडीचे पुनर्वसन याच ठिकाणी जवळ व्हावे म्हणून जागाही शोधून ठेवण्यात आली आहे. कांदिवलीत गोयल यांनी कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून 35 हजार तरुणांना रोजगार दिला. झोपडपट्टी वासियांसाठी महानगरपालिकेतून जे-जे करता येईल जसे बाळकृष्ण ब्रीद यांनी काम केले तसेच प्रकाश दरेकर हे ताकदीने करतील. लाडक्या बहिणींसाठी शून्य टक्के व्याज दराने कर्ज योजना आणली. लाडक्या बहिणींना दीड हजार मिळाले. आता लखपती दीदी करू. 15 तारखेला प्रकाश दरेकर, प्रीतम पंडागळे यांच्या कमळा समोरील बटण दाबून त्यांना प्रचंड मतांनी महापालिकेत पाठवा, अशी विनंतीही दरेकरांनी केली.
दरम्यान, यावेळी दहिसर (पूर्व) येथील सभेत मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री खा. पीयूष गोयल आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला.
प्रभाग क्रमांक 03 चे महायुतीचे उमेदवार प्रकाश दरेकर म्हणाले की, मी नक्कीच या प्रभागाचा कायापालट करेन. प्रभाग क्रमांक 5 चा नगरसेवक असताना महापालिकेच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे केली. आता पुन्हा एकदा इतिहास घडवेन. प्रभाग क्रमांक 3 पाच वर्षात मुंबई शहरातील एक नंबरचा प्रभाग करण्याचा माझा मानस असल्याचेही प्रकाश दरेकर म्हणाले.
मुंबई : प्रभाग क्रमांक 03 चे महायुतीचे उमेदवार प्रकाश दरेकर यांच्या प्रचारार्थ नॉर्दर्न हाईट्स, एस. व्ही. रोडच्या जवळ, संमेलन हॉटेलच्या शेजारी झालेल्या जाहीर सभेत बोलताना केंद्रीय वाणिज्य मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल, व्यासपीठावर भाजपचे गटनेते आ. प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी आदी मान्यवर. दुसऱ्या छायाचित्रात सभेला उपस्थित प्रचंड जनसमुदाय.