

अंबरनाथ : काँग्रेसच्या बारा नगरसेवकांसोबत घरोबा करून शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेऊ पाहणाऱ्या भाजपा विरोधात टीकेची झोड उठल्यानंतर भाजपा ने युतीच्या बोलणीसाठी भाजपाने थेट उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यात बैठक घेतली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत युतीची यशस्वी बोलणी झाल्यानंतर पुन्हा माशी शिंकली व रविवारी दुपारी भाजपा ने शिवसेनेसोबत युती न करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत घेतला. युती फिस्कटल्याने पुन्हा एकदा सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे आता सोमवार 12 जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षीय बलाबल समोर येणार आऊन शिवसेनेचे पारडे मात्र जड असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
काँग्रेसच्या बारा नगरसेवकांना सोबत घेतल्याने भाजपावर सर्वच स्तरातून टीका झाली होती. त्यानंतर भाजपा ने काँग्रेसच्या बारा नगरसेवकांचा भाजपात प्रवेश करून घेतला व राष्ट्रवादी(अजित पवार गट) यांच्या सोबत घरोबा करून आपल्याकडे भाजपा 14, काँग्रेस 12, राष्ट्रवादी 4 आणि एक अपक्ष असे एकूण 59 सदस्यांपैकी 31 सदस्य आपल्या गोटात सामील केले. शिवसेनेला सत्तेपासूनदुर ठेवण्याचा भाजपाचा हा कुटील डाव होता. मात्र राष्ट्रवादी गट भाजपातून बाहेर पडून त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे 27, राष्ट्रवादी 4 आणि एक अपक्ष असे 32 संख्याबळ होऊन शिवसेनेने उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी बहुमताचा आकडा जमवला आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष पद व सहाही समित्या शिवसेनेकडे येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादी ला सोबत घेत शहर विकास आघाडी स्थापन करून आपला गट तयार केला व त्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात केली. मात्र काँग्रेस च्या 12 नगरसेवकांचे निलंबन काँग्रेस पक्षाने केल्यानंतर या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी या गटातून बाहेर पडत शिवसेनेला पाठिंबा दिला. व त्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात केली. त्यामुळे भाजपा चा व्हीप त्यांना लागू नसून त्यांचे निलंबन देखील होणार नाही.
डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना आमदार
आपली राजकीय खेळी उधळली गेल्याचे दिसताच भाजपा चे पदाधिकारी व नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांचे सासरे गुलाबराव करंजुले व नगरसेवक अभिजित करंजुले हे दोघेही उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या बंगल्यात युती साठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना भेटले. शनिवारी मध्यरात्री उशिरापर्यंत युतीची बोलणी झाल्यानंतर पुन्हा भाजपा ने युतीचा डाव मोडला व शिवसेनेसोबत युती करणार नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यामुळे पुन्हा उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.