

अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यातच महिलेने बाळाला जन्म दिला आहे. शनिवारी रात्री कल्याण ते अंबरनाथ असा प्रवास करताना अचानकपणे महिलेला प्रसूतीकळा सुरु झाल्या. महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. लोकल अंबरनाथ स्थानकात पोहचताच प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली.
तात्काळ रेल्वेच्या ऑन ड्यूटी महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली नन्देश्वर यांनी परिस्थितीच गांभीर्य ओळखले. त्यांनी लोकलमध्येच महिलेच्या प्रसूतीची तयारी केली. लोकलच्या डब्यातून सर्व पुरुष प्रवाशांना उतरवून दरवाजे बंद करण्यात आले. अखेर लोकलच्या डब्यातच या महिलेची सुरक्षित प्रसूती झाली. महिलेच्या प्रसूतीकळांनी धीरगंभीर झालेल्या प्रवाशांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
अंबरनाथमध्ये राहणारी अंजू काळे ही 23 वर्षीय गर्भवती महिला काही कामानिमित्त कल्याणला गेली होती. त्यानंतर परतीचा प्रवास करताना तिची प्रसूती झाली. कल्याणहून लोकलने अंबरनाथला परत येत असताना या महिलेला अचानक लोकलमध्ये प्रसूती वेदना होऊ लागल्या. शनिवारी रात्री 8 वाजून 5 मिनिटानी ही लोकल अंबरनाथ स्थानकात दाखल होताच काही प्रवाशांनी तत्काळ आरपीएफ कार्यालयात धाव घेऊन याबाबतची माहिती दिली.
महिला पोलिस उपनिरीक्षक सोनाली नन्देश्वर यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे व धाडसामुळे लोकल डब्यातच या महिलेची सुरक्षित प्रसूती झाली. महिला पोलीस उपनिरीक्षक नन्देश्वर यांनी दाखवलेल्या या समयसूचकतेच प्रवाशांकडून कौतुक होत आहे. प्रसूती नंतर नवजात बाळाला व आईला तातडीने अंबरनाथच्या छाया रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघींचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
शनिवारी रात्री या प्रसूती झालेल्या महिलेला डॉ. बी.जी. छाया उप जिल्हा रुग्णालयात आणले होते. त्यांची आवश्यक काळजी व औषधोपचार करण्यात आला. तिच्या सोबत कुणीच नसल्याने आम्हीच तिला आमच्या डब्यातील वरण भात खाऊ घातला. आई व बाळ दोघेही सुखरूप असून त्यांना दोन दिवसांनी घरी सोडण्यात येईल.
डॉ. शुभांगी भारमर, उप जिल्हा रुग्णालय
अंबरनाथ ट्रेन असल्यामुळे ती फलाटावर येऊन थांबली त्याच वेळेस प्रवाशांचा आवाज येत होता. मला त्यांच्या बोलण्यातून महिलेची प्रसुती होत असल्याचं लक्षात आलं. मी तात्काळ त्या दिशेने धावले. माझ्या सहकाऱ्यांना आवश्यक गोष्टी जश्या फर्स्ट एड आणि बेडशीट वगैरे आणायला सांगितले. तात्काळ डबा रिकामा करून घेतला आणि या महिलेची डिलिव्हर सुखरूप झाली.
सोनाली नांदेश्वर, रेल्वे पोलीस उपनिरीक्षक