

मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या सामन्यात गुजरात जायंटस्ने दिल्ली कॅपिटल्सवर 4 धावांनी विजय मिळवला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 209 धावांचा डोंगर उभारला. यात सोफी डिव्हाईनने 95 धावांची धडाकेबाज खेळी केली. डिव्हाईनने स्नेह राणाच्या एका षटकात 32 धावा कुटल्या. हे महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक ठरले. मात्र, याचवेळी नंदनी शर्माने हॅट्ट्रिकसह 5 बळी घेऊन लक्षणीय कामगिरी केली.
210 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून लिझेल ली आणि लॉरा वोलवार्ड यांनी अनुक्रमे 86 आणि 77 धावांची शानदार अर्धशतकी खेळी साकारली. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले आणि संघाला केवळ 4 धावांनी निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले.
तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार जेमिमाह रॉड्रिग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यासह गुजरात जायंटस्ने स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला आहे.
गुजरात जायंटस् महिला : 20 षटकांत सर्वबाद 209.(सोफी डिव्हॉईन 42 चेंडूंत 7 चौकार, 8 षटकारांसह 95, ॲश्ले गार्डनर 26 चेंडूंत 4 चौकार, 3 षटकारांसह 49. नंदनी शर्मा 4 षटकांत 5/33, हेन्री, श्री चरणी प्रत्येकी 2 बळी).
दिल्ली कॅपिटल्स महिला : 20 षटकांत 5/205 (लिझेले ली 54 चेंडूंत 12 चौकार, 3 षटकारांसह 86, लॉरा वोल्वार्ड 38 चेंडूंत 9 चौकार, 3 षटकारांसह 77. सोफी डिव्हॉईन, राजेश्वरी गायकवाड प्रत्येकी 2 बळी).
यूपी वॉरियर्स महिला
वि. आरसीबी महिला
वेळ : सायंकाळी 7.30 वाजता