

Mumbai Local Pass: मुंबई लोकलने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता आणखी झळ बसणार आहे. UPI द्वारे 2 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किमतीचा तिकीट किंवा पास खरेदी करणाऱ्या प्रवाशांना आता MDR (Merchant Discount Rate) आणि त्यावरील GST भरावा लागणार आहे. 15 ऑक्टोबर 2026 पासून हे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार असल्याने महागडे मासिक, त्रैमासिक आणि इतर कालावधीचे पास घेणाऱ्या प्रवाशांच्या खर्चात वाढ होणार आहे.
रेल्वेच्या नव्या नियमांनुसार, 2 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या UPI व्यवहारावर सरसकट 5 रुपये MDR आकारला जाणार आहे. या 5 रुपयांवर 18 टक्के GST लागू झाल्याने प्रवाशांना एकूण 5.90 रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. 14 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर, म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून हे नवीन दर लागू होणार आहेत.
या निर्णयाचा परिणाम केवळ मासिक पासपुरता मर्यादित राहणार नसून साप्ताहिक, पंधरवड्याचा, मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पासवरही होणार आहे. याशिवाय लोकलच्या पाससोबत मेल-एक्स्प्रेसचे तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांनाही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.
तिकीट खिडकीवरून UPI पेमेंट करून पास घेणाऱ्या प्रवाशांप्रमाणेच ‘रेलवन’ ऑनलाइन अॅपवरून पास खरेदी करणाऱ्या प्रवाशांनाही MDR लागू होणार आहे. त्यामुळे डिजिटल पद्धतीने पास घेणाऱ्या प्रवाशांनाही या शुल्काचा फटका बसणार आहे.
मुंबई लोकलमधून दररोज सुमारे 75 ते 80 लाख प्रवासी प्रवास करतात. यामध्ये दररोज तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांपेक्षा पासधारक प्रवाशांचे प्रमाण अधिक आहे. विशेषतः प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित लोकलचे मासिक व त्रैमासिक पास घेणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
द्वितीय श्रेणीच्या तुलनेत प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित लोकलचे पास महाग असल्याने 2 हजार रुपयांची मर्यादा सहज ओलांडली जाते. त्यामुळे या श्रेणीतील पासधारकांना 5.90 रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.
उदाहरणार्थ, CSMT ते पनवेल दरम्यान दादर-कुर्ला मार्गे किंवा ठाणे-तुर्भे-जुईनगर मार्गे प्रवास करण्यासाठी एका महिन्याच्या एसी पासची सध्याची किंमत 2,750 रुपये आहे. MDR आणि GST लागू झाल्यानंतर या पाससाठी 2,755.90 रुपये मोजावे लागतील.
त्याचप्रमाणे CSMT ते कल्याण दरम्यान एका महिन्याच्या एसी पासची सध्याची किंमत 2,340 रुपये आहे. नवीन शुल्क लागू झाल्यानंतर त्याची किंमत 2,345.90 रुपये होईल.
CSMT ते ठाणे दरम्यान एका महिन्याच्या एसी पाससाठी सध्या 1,775 रुपये, तर तीन महिन्यांच्या पाससाठी 4,815 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे तीन महिन्यांच्या पासवर MDR लागू होणार आहे.
CSMT ते कल्याण दरम्यान तीन महिन्यांच्या प्रथम श्रेणीच्या पाससाठी सध्या 3,295 रुपये आकारले जातात. MDR आणि त्यावरील GST जोडल्यानंतर या पाससाठी प्रवाशांना 3,300.90 रुपये मोजावे लागतील.
दरम्यान, MDRचा आर्थिक भार थेट प्रवाशांवर टाकण्याऐवजी रेल्वे प्रशासनानेच हा खर्च करावा, अशी मागणी होत आहे. झेडआरयूसीसीचे सदस्य कैलाश वर्मा यांनी MDR रद्द करण्याबाबत अर्थ खात्याकडे प्रस्ताव पाठवण्याची मागणी केली आहे.
मुंबईतील लाखो लोक दररोज लोकल रेल्वेवर अवलंबून आहेत. त्यामुळे आधीच वाढत्या प्रवासखर्चाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल पेमेंटसाठी अतिरिक्त शुल्क आकारल्याने नियमित प्रवाशांच्या खर्चात आणखी भर पडणार आहे.