

मुंबई : मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे व नागपूर या प्रमुख शहरांमध्ये वाहतूक व्यवस्था सुलभ आणि वेगवान करण्यासाठी मेट्रो, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, सागरी सेतू आणि किनारी रस्त्यांचे मोठे जाळे उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. येत्या काही वर्षांत हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यात 2047 पर्यंत प्रवासी व माल वाहतुकीसाठी सलग संपर्क जाळे निर्माण करण्यासाठी 1 हजार 200 किमी लांबीचे मेट्रोमार्ग तसेच 6 हजार किमीपेक्षा जास्त द्रुतगती मार्ग विकसित करण्याचे नियोजन अर्थसंकल्पात मांडले आहे. या सर्व प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील प्रमुख शहरांमधील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचणार
असून आर्थिक आणि औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.
मेट्रो जोडणार विमानतळे
मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग-8 हा 22,862 कोटी रुपयांचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. तसेच तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो मार्ग-2 हा 5,575 कोटींचा प्रकल्प राबविण्यात येत असून यामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे.
मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये एकूण 490 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गांचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी 173 किलोमीटर लांबीचे मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. पुढील वर्षात आणखी 50 किलोमीटर मेट्रो मार्ग सुरू करण्याचे नियोजन असून 2029 पर्यंत आणखी 165 किलोमीटर मार्ग सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे.
वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका-11 चा 32 हजार 487 कोटी रुपयांचा पूर्णपणे भुयारी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या मार्गाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरी स्थानक आणि वांद्रे टर्मिनसपर्यंत करण्याचे नियोजन आहे.
भुयारी मार्गांचे जाळे
अर्थसंकल्पात मुंबई आणि पुण्यातील वाहतूक कोंडी
कमी करण्यासाठी भुयारी मार्गांचे जाळे उभारण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील ऑरेंज गेट, पूर्व मुक्त मार्ग ते मरिन ड्राइव्हदरम्यानच्या भुयारी मार्गासाठी लाँचिंग शाफ्टचे बांधकाम पूर्ण झाले असून हा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड भुयारी मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिवाय ठाणे ते बोरिवली या 18 हजार 838 कोटी रुपयांच्या भुयारी मार्गाचे काम प्रगतिपथावर असून जून 2028 पर्यंत तो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
खारघर ते तुर्भे या सुमारे 6 किलोमीटर लांबीच्या 2 हजार 100 कोटी रुपयांच्या भुयारी मार्गाचे कामही सुरू आहे. हा प्रकल्प सप्टेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
एकात्मिक भुयारी मार्ग रस्ता प्रकल्पांतर्गत वांद्रे-वरळी सागरी सेतू ते बुलेट ट्रेन स्थानक, वांद्रे-कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यात येणार आहे. तसेच गायमुख जंक्शन ते फाउंटन हॉटेल जंक्शनदरम्यान सुमारे 6 किमी लांबीचा भुयारी मार्ग व फाउंटन हॉटेल ते भाईंदरदरम्यान 9 किमी लांबीचा उन्नत मार्ग प्रस्तावित केला आहे.
उन्नत मार्गांचे काम
अटल सेतू ते पश्चिमेकडील सागरी किनारा
मार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू यांच्या दरम्यान मुंबईतील सिग्नलमुक्त वाहतुकीसाठी शिवडी ते वरळी उन्नत मार्गाचे काम प्रगतिपथावर असून ते सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
ऐरोली ते कटाई नाका या उन्नत मार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणाऱ्या उन्नत मार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे.
अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जोडणारा 1 हजार 102 कोटी रुपयांचा उन्नत मार्ग फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
याशिवाय दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी थेट जोडण्याकरीता छेडा नगर ते आनंद नगर आणि आनंद नगर ते साकेत (ठाणे) या उन्नत मार्गांच्या कामालाही गती देण्यात आली आहे. या उन्नत मार्गाचे काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच साकेत ते आमणेदरम्यान उन्नत मार्गाच्या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे.
सागरी सेतू आणि किनारी रस्ते
स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू हा सुमारे 18 हजार 129 कोटी रुपयांचा प्रकल्प असून त्याचे चारही टप्प्यांचे काम सुरू आहे. हा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
वर्सोवा-दहिसर-भाईंदर हा सुमारे 60 किलोमीटर लांबीचा किनारी मार्ग 22 हजार 166 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येत असून डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
मुंबई-वाढवण द्रुतगती मार्गाशी जोडणी करण्यासाठी उत्तन ते विरारदरम्यान 58 हजार 754 कोटी रुपयांचा सागरी सेतू उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी रस्ता प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून हा प्रकल्प डिसेंबर, 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
अटल सेतूला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याकरिता उलवे किनारी मार्गाचे काम जुलै, 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
पनवेल ते कर्जत या 2 हजार 782 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे कर्जत उपनगरीय काम अंतिम टप्प्यात असून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.