

मुंबई : निधी टंचाईमुळे योजना लवकरच बंद पडणार असल्याच्या विरोधकांच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चपराक लगावली असून, राज्यात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यापुढेही सुरूच ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जाहीर केले आहे. या योजनेसाठी भरीव तरतूद करून त्यांनी विरोधकांची बोलती बंद केली आहे.
एकल महिलांच्या कल्याणासाठी सर्वेक्षण सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर एकल महिलांच्या कल्याणासाठी धोरण आणले जाणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आतापर्यंत सुमारे 37 लाख ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत. या आर्थिक वर्षात आणखी 25 लाख ‘लखपती दीदी’ करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या वस्तू व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याकरिता पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणीस मान्यता देण्यात आलेली आहे.
तृतीयपंथी यांच्या सर्वांगीण विकासाकरिता धोरण जाहीर करण्यात आले असून, त्यांच्या स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल, तर मुंबईतील बांद्रे येथे चर्मकला डिझाईन व उत्पादन अध्यायावत केंद्र स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे.
दिव्यांगांकरिता कौशल्य विकास व उद्योजकता विकास केंद्रे
दिव्यांग व्यक्तींकरिता राज्यात 36 कौशल्य विकास व उद्योजकता विकास केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना आता दीड हजारऐवजी अडीच हजार रुपये दिले जातील.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड (रायगड) येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त तेथील पायाभूत सोयी-सुविधांकरिता विकास आराखडा तयार करण्यात येईल. महात्मा फुले, संत गाडगेबाबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या स्मृतींचे हे विशेष वर्ष लक्षात घेता 2026-27 हे वर्ष ‘सामाजिक समता व समरसता वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येईल. त्यांच्या कार्याचा गौरव करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल.