

सहकार, प्रशासनावरील उत्तम पकड आणि थेट निर्णयशैलीचे दुसरे नाव म्हणजे अजित पवार. फारसा गाजावाजा न करता क्रीडा क्षेत्राशी थेट वेगळे नाते निर्माण करणारे, ते जपणारे दुसरे नाव म्हणजे अजित पवार. खेळाडू, प्रशिक्षकच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यात अनेक मैदाने, क्रीडा संकुले आणि विविध स्पर्धांमागे ज्यांची छाया सातत्याने जाणवायची, त्याचे दुसरे नाव म्हणजे अजित पवार. क्रीडा क्षेत्रासाठी अविरत झटणारे दादा हरपल्याची हळहळ क्रीडा क्षेत्रातही कटाक्षाने जाणवत आहे.
आपल्या राजकीय वाटचालीत अजितदादांनी क्रीडा क्षेत्राकडे सातत्याने कटाक्ष ठेवला. त्यांची क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याची वेगळी दृष्टी यातून तयार झाली. खेळ हा केवळ छंद नाही तर तो शिस्त आणि आत्मविश्वास घडवतो, असे ते सातत्याने सांगत असत. उपमुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत क्रीडा क्षेत्र हमखास त्यांच्या अजेंड्यावर असायचे. कडक शिस्त आणि प्रशासनावरील जबरदस्त पकडीसाठी ओळखले जाणारे, थेट निर्णय घेणारे दादा या सर्व माध्यमातून दूरदृष्टीची मोहोर उमटवण्यात कमालीचे यशस्वी ठरले!
अजितदादांचे आपल्या वलयाच्या पलीकडे क्रीडा क्षेत्राशी असलेले जिव्हाळ्याचे नाते सातत्याने अधोरेखित झाले. अजितदादांची क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याची दृष्टी पूर्णपणे व्यावसायिक होती. खेळ हा केवळ विरंगुळा नसून तो मानवी आयुष्यात शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण करतो, असे ते नेहमी सांगत. खेळाडूंच्या पायाखालची माती सरकारी प्रक्रियेमुळे थंड पडता कामा नये. ही त्यांची तळमळ क्रीडा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारी ठरली.
पारंपरिक खेळांची पाठराखण
कबड्डी, कुस्ती आणि मल्लखांब हे खेळ आपली खरी ओळख असल्याचे सांगत त्यांनी ग्रामीण स्पर्धांना सरकारी मान्यता आणि पुरस्कार मिळवून दिली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि स्टेडियम विकासात त्यांनी लक्षवेधी योगदान दिले. राज्यात सर्वदूर क्रीडा सुविधा पोहोचवण्यात ते नेहमी अग्रेसर राहिले. खेळाडूला पक्ष नसतो, त्याला संधीची गरज असते, हे त्यांचे ब्रीदवाक्य त्यांच्या कृतीतूनही उमटत राहायचे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंचा प्रवासखर्च असो किंवा दुखापतीनंतर उपचारांसाठी लागणारा निधी, अजितदादांनी कागदी घोडे न नाचवता काही मिनिटांत निर्णय घेऊन खेळाडूंना आधार दिला.
एरवी राजकारणाच्या मैदानावर कठोर भासणारे दादा खेळाडूंच्या प्रश्नावर मात्र नेहमीच हळवे आणि संवेदनशील असायचे. त्यांनी क्रीडा क्षेत्रासाठी केवळ उद्घाटक म्हणून न राहता मैदान, खेळाडू व आधुनिक व्यवस्थापनाची नवी मोट बांधली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या क्रीडा क्रांतीचा एक भक्कम आधारस्तंभ कोसळला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून क्रीडा क्षेत्राशी जवळचे नाते होते. महाराष्ट्राच्या राजकारणात ‘दादा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांच्या निधनावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या विद्यमान अध्यक्षा पी. टी. उषा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मोलाचे कार्य केले. त्यांच्या जाण्याने क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाली असून मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.
- भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा
अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक समर्पित लोकनेता गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना.
- माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर
अजित पवार हे राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध असणारे नेतृत्व होते. त्यांच्या निधनाचे वृत्त मन हेलावणारे आहे. या भीषण अपघाताची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
- माजी अष्टपैलू युसूफ पठाण
बारामतीतील विमान अपघाताची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. ईश्वर मृतांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे अतीव दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
- मुष्टियोद्धा विजेंदर सिंग
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे तीव्र दुःख झाले आहे. या कठीणप्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.
- आघाडीचा फलंदाज अजिंक्य रहाणे
अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने मी सुन्न झालो आहे. पवार कुटुंबाला या धक्क्यातून सावरण्यासाठी ईश्वर धैर्य देवो.
- माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन