

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या बरोबरीने अजित पवार पक्षात कर्ते-धर्ते झाले तेव्हापासून पुणे जिल्ह्यानंतर बीड हा त्यांचा आवडता जिल्हा बनला होता. पवारांच्या साम्राज्याला दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीडमधून आव्हान उभे केले होते. त्यांचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने अजित पवारांनी मुंडेंच्याच सहकाऱ्यांना सोबत घेऊन बीडमध्ये नवी राजकीय फळी उभी केली. याचा परिणाम असा झाला की पुणे जिल्ह्यानंतर बीडमधून राष्ट्रवादीला राजकीय पाठबळ मिळू लागले.
वर्षभरापूर्वी बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीडचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रीपद गमवावे लागले. अशा विपरीत राजकीय परिस्थितीत अजित पवारांनी बीड आणि पक्षाची प्रतिमा बदलण्यासाठी थेट बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. प्रशासन आणि कार्यकर्त्यांना शिस्त लावत त्यांनी अल्पावधीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला.
बीड जिल्ह्याच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्यांनी तरुणांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी पावले टाकली. विमानतळ, रेल्वे, रस्ते तसेच इतर पायाभूत सुविधांना प्राधान्य देत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या या धडाडीच्या निर्णयामुळे पुढील काही वर्षांत बीड जिल्हा विकासाच्या वाटेवर येईल, अशी आशा बीडकरांना वाटू लागल्या होत्या. पण अजित पवार यांची अकाली एक्झिट बीडसाठी निराशाजनक ठरली आहे.
पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवारांनी कार्यकर्ते आणि प्रशासन यांना शिस्त लावत विकासकामांना गती देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. बीडमध्ये आले की बीडकर झोपेत असताना सकाळी सहा वाजल्यापासून त्यांचा पाहणी दौरा सुरू होत असे. रात्री उशिरापर्यंत प्रशासकीय बैठका आटोपून कार्यकर्ते व नेत्यांच्या भेटी घेऊन ते कामे मार्गी लावत. जे काम शक्य आहे ते जागेवर करणे, अन्यथा स्पष्टपणे ‘नाही’ सांगणे, तसेच चुकीची कामे करू नका, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबी देऊन त्यांनी बीडच्या राजकारणाला वळण लावण्याचा प्रयत्न केला.
जिल्ह्यातील सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन तरुणांच्या हाताला काम मिळावे, यासाठी टाटा कंपनीच्या सहकार्याने प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले. रेल्वे कामाला गती देण्यात आली, विमानतळासाठी जागा पाहून आराखडा तयार करण्यात आला. शहरातील क्रीडा संकुलाचा पुनर्विकास तसेच इतर महत्त्वाच्या विकासकामांनाही त्यांनी वेग दिला. नगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या शब्दावर बीड नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली.
आमदार विजयसिंह पंडित यांच्या मागणीनुसार अवघ्या दोन दिवसांपूर्वी शहरातील रस्त्यांसाठी तब्बल 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीमध्येही बीडला अधिक निधी देण्यात आला. पुणे जिल्ह्यानंतर बीड हा माझा जिल्हा आहे या भूमिकेतून अजित पवारांनी काम सुरू केले होते. अवघ्या वर्षभराच्या कालावधीत पालकमंत्री म्हणून खऱ्या अर्थाने पालकत्व घेतलेल्या अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यामुळे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या नशिबी दुर्दैव आले.