

मुंबई : राज्यातील शासकीय रुग्णालये आणि शहरी आरोग्य केंद्रांमध्ये आता मेनोपॉजबाबत उपचार मिळणार आहे. या रुग्णालयांत स्वतंत्र ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत.
मेनोपॉज हा महिलांच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा टप्पा असून, या काळात महिलांना शारीरिक, मानसिक आणि हार्मोनल बदलांचा सामना करावा लागतो. यासाठी मेनोपॉज-केंद्रित आरोग्यसेवा आता संस्थात्मक स्वरूपात सुरू करण्यात आली आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, महिलांच्या आरोग्यासाठी दिलेली ही एक अर्थपूर्ण व आरोग्यदायी ‘भेट’ म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे. या मेनोपॉज क्लिनिकमध्ये महिलांना एकाच छताखाली सर्वांगीण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मेनोपॉज हा आजार नाही, तर महिलांच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा आहे. मात्र, या काळात महिलांना शारीरिक आणि भावनिक आधाराची गरज असते. हे लक्षात घेऊनच मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले असून महिलांचे आरोग्य सुदृढ असेल, तर राज्य अधिक सक्षम होईल, असे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.
मेनोपॉज क्लिनिकमुळे महिलांना तज्ज्ञ सल्ला, तपासण्या, समुपदेशन, हाडांचे आरोग्य, मानसिक आरोग्य आणि जीवनशैलीविषयक मार्गदर्शन मिळणार असून, रजोनिवृत्तीच्या टप्प्यातील महिलांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे.