

मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी क्वांटम कॉम्प्युटिंग आणि क्वांटम टेक्नॉलॉजी या भविष्यातील अत्याधुनिक क्षेत्रात प्रवेशाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केंद्र शासनाच्या स्वयम आणि एनपीटीईएल या अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या मोफत अभ्यासक्रमांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, असे निर्देश राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.
जागतिक पातळीवर वेगाने विकसित होत असलेल्या क्वांटम तंत्रज्ञानाचा वापर सायबर सुरक्षा, आरोग्य, औषधनिर्मिती, आर्थिक सेवा, संरक्षण आणि अंतराळ संशोधन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये वाढत आहे. ही गरज ओळखून भारत सरकारने राष्ट्रीय क्वांटम मिशन सुरू केले असून, यासाठी हजारो कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भविष्यात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे.
याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना लवकरच उदयोन्मुख तंत्रज्ञानात कौशल्य मिळावे, यासाठी हे अभ्यासक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत. क्वांटम कॉम्प्युटिंग हे आंतरशाखीय क्षेत्र असून भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, गणित आणि अभियांत्रिकी यांचा समन्वय यात आहे. पोर्टलवर इंट्रोडक्शन टू क्वांटम कॉम्प्युटिंग, क्वांटम अल्गोरिदम, किस्किट आणि क्वांटम इन्फॉर्मेशन यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.=
भविष्यातील तंत्रज्ञान म्हणून क्वांटम कॉम्प्युटिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणासोबतच या विषयातील मूलभूत आणि प्रगत ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. स्वयम आणि एनपीटीईएलवरील अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांची कौशल्ये वाढून त्यांची रोजगारक्षमता निश्चितच वाढेल.
डॉ. विनोद मोहितेकर, संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय