वसई-विरार पालिकेचा वैद्यकीय अधिकारीच निघाला ‘मुन्‍नाभाई एमबीबीएस’ | पुढारी

वसई-विरार पालिकेचा वैद्यकीय अधिकारीच निघाला ‘मुन्‍नाभाई एमबीबीएस’

नालासोपा ; पढारी वृत्तसेवा : विरार नालासोपार्‍यात स्वत:ची रुग्णालये चालवणारा आणि वसई-विरार महापालिकेत तब्बल अडीच वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलेला डॉ. सुनील वाडकर हा बोगस डॉक्टर असल्याचे निष्पन्‍न झाले आहे. ‘मुन्‍नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाची आठवण करून देणार्‍या या प्रकाराने वसई, विरारमध्ये खळबळ उडाली आहे. या बोगस डॉक्टरवर (Bogus doctor) विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

या बोगस डॉक्टरने (Bogus doctor) वसई-विरार महापालिकेत तब्बल अडीच वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले तरी त्याबाबत कोणाला थांगपत्ता लागला नाही. मंगळवारी पहाटे सुनील वाडकरला गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने व वसई तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योजना जाधव यांनी संयुक्‍त कारवाई करून अटक केली आहे. त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी अधिकृत पदवी प्रमाणपत्र नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले आहे.

डॉ. सुनील वाडकर हा वसई-विरार महापालिकेचा माजी वैद्यकीय अधिकारी होता. त्यावेळी त्याने अनेक बोगस डॉक्टरांवर आणि सोनोग्राफी सेंटरवर कारवाई केली होती. आता वसई तालुका वैद्यकीय अधिकारी व पोलिसांनी केलेल्या तपासात तो सुद्धा बोगस असल्याचे समोर आले आहे. त्याची वैद्यकीय पदवी बोगस असल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती.

वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागात त्याने 2010 ते 2013 या काळात काम केले. त्यानंतर त्याने खासगी रुग्णालय सुरू केल्यावर एकाने गुन्हे शाखेकडे त्याची एमबीबीएस पदवी बोगस असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. वाडकरला सेवेत भरती करणार्‍या अधिकार्‍यांवरही महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

हेही वाचा : 

Back to top button