ओमायक्रॉन व्हेरियंटचे मुंबईत आणखी ७ नवे रुग्ण | पुढारी

ओमायक्रॉन व्हेरियंटचे मुंबईत आणखी ७ नवे रुग्ण

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : जगभर गतीने संसर्ग करणार्‍या ओमायक्रॉन व्हेरियंटचे मुंबईत आणखी 7 नवे रुग्ण मंगळवारी आढळले. वसईतही एक रुग्ण आढळल्याने ओमायक्रॉन बाधितांची राज्यातील रुग्णसंख्या 28 वर पोहोचली आहे.

मुंबईत 12, पिंपरी – चिंचवडमध्ये 10, पुणे 2, कल्याण डोंबिवली, लातूर, नागपूर आणि वसईत प्रत्येकी 1 असे एकूण 28 रुग्ण राज्यात ओमायक्रॉन आहेत. यापैकी 9 रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

नव्या आठही रुग्णांचे नमुने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आले होते. यात 5 पुरुष तर तीन महिलांचा समावेश आहे. 24 ते 42 या वयोगटातील रुग्ण असून, यातील तिघांना कोणतीही लक्षणे नाहीत. 5 जणांना सौम्य स्वरुपाची लक्षणे आहेत. पैकी 7 रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर एकाचे लसीकरण झालेले नाही.

1 डिसेंबरपासून राज्यात अतिजोखमीच्या देशांतून 13 हजार 615 रुग्ण आले असून यातील 30 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. आतापर्यंत 430 नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठवले आहेत. त्यातील 21 नमुन्यांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

नाशकात एक कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक : दक्षिण आफ्रिकेतून नाशिक शहरात आलेल्या एका व्यक्‍तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. या व्यक्‍तीला ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली असल्याचा संशय आहे. तिच्या स्वॅबचे नमुने जिनोम सिक्‍वेंन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. ही व्यक्‍ती सिडकोतील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होती. तिच्या संपर्कात आलेल्या बारा हॉटेल कर्मचार्‍यांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे.

नाशिक शहरात गेल्या पंधरा दिवसांत विविध देशांतून 674 विदेशी नागरिक, पर्यटक दाखल झाले आहेत. त्यापैकी 253 जणांच्या चाचण्या आतापर्यंत झाल्या असून, 252 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Back to top button