पुणे : प्रसाद जगताप : चुकून घरात पाकिटामध्ये लायसेन्स विसरले, तर नवा वाढीव दंड… घाई गडबडीत दुसर्याची गाडी आणली, पण कागदपत्रे नाहीत … वाहनाचा इन्शुरन्स नाही …गडबडीत हेल्मेट विसरले… या सार्या गोष्टींसाठीसुद्धा नवा वाढीव दंड. परंतु 'व्हीव्हीआयपीं'च्या गाड्यांवर भाऊ, दादा, मामा लिहिलेल्या अवैध नंबर प्लेटसाठी असलेल्या दंडात मात्र अजिबात वाढ केलेली नसल्याने वाहनचालकांत नाराजी आहे. शासन दादा, मामा असे नंबर प्लेटवर लिहिणार्यांना या दंडाच्या वाढीतून सूट देऊन, फक्त आमचीच लूट करीत आहे, अशा सामान्य पुणेकरांच्या भावना आहेत.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यशासनाने वाहतूक नियमभंगासाठी नुकतेच वाढीव दंड लागू केले आहेत. त्यामुळे अगोदरच वाढीव दंडामुळे वाहनचालकांमध्ये नाराजीचे वातावरण असताना त्यातच आता 'व्हिआयपीं' ना शासनाने दिलेल्या या सुटीमुळे सामान्य वाहनचालक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. सामान्यांसाठी दंड वाढला असून, व्हिआयपींच्या गाड्यांवरील दादा, मामा, भाऊ यांसारखे नाव असलेल्या नंबर प्लेटसाठीच्या दंडात वाढ केलेली नाही. त्यामुळे शासनाच्या आणि परिवहन विभागाच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नवीन नियमानुसार आकारण्यात येणार्या दंडाची रक्कम मोठी आहे. काही नियमांचे उल्लंघन केल्यास तर पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. कारवाईदरम्यान अनेकदा वाहतूक पोलिस आणि वाहनचालकांमध्ये वादावादीच्या घटना घडतात. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यापर्यंत हा प्रकार जातो. त्यामुळे नवीन नियमानुसार कारवाई करताना वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांत वादावादी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
''शासन सरळ-सरळ अवैध नंबर प्लेट असणार्यांसह व्हीआयपी लोकांची पाठराखण करीत आहे, असा याचा अर्थ होतो. सामान्य माणसावर कायमच अन्याय केला जातो. आता परिवहन विभागानेसुद्धा अवैध नंबर प्लेटसाठी दंड न वाढवता त्यांची पाठराखणच केली आहे. हे कुठेतरी थांबायला हवे.''
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच
''शासनाने दंडाची रक्कम वाढविताना कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा विचार करायला हवा होता. आताच कुठे तरी सावरत असताना पुन्हा शासनाने वाढीव दंडाचा सामान्यांवर बोजा टाकत लखपती, कोट्यधीशांची सरळ-सरळ पाठराखण केली आहे. हे चुकीचे आहे. शासनाने त्यांच्यावरील दंडाची रक्कम वाढवून, सामान्यांना इतर दंडातून सूट द्यावी.''
– सुशांत खरीवले, वाहनचालक
अवैध नंबर प्लेट
(दादा, मामा, भाऊ, तात्या व अन्य)
– पूर्वीचा दंड – 1000 रुपये
– नवीन दंड – 1000 रुपये
(यात काहीही वाढ नाही)