एसटीच्या युपीआय पेमेट सुविधेचा बट्ट्याबोळ; वाहकांना अ‍ॅण्ड्रॉइड तिकीट मशिन वापरता येईना | पुढारी

एसटीच्या युपीआय पेमेट सुविधेचा बट्ट्याबोळ; वाहकांना अ‍ॅण्ड्रॉइड तिकीट मशिन वापरता येईना

मुंबई : सुरेखा चोपडे : सुट्टया पैशांची कटकट मिटविण्यासाठी एसटी महामंडळाने डिजिटल पेमेण्ट सुरू केले. परंतु अ‍ॅण्ड्रॉइड इलेक्ट्रिक तिकीट मशिन वापरता येत नसल्याने रोख पैसे देऊनच तिकिट काढण्याचा आग्रह वाहकांकडून धरला जात आहे. त्यामुळे रोज प्रवास करणार्‍या 55 लाख प्रवाशांपैकी केवळ 6 हजार प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत.

डिजिटल व्यवहाराला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून महामंडळाने बसमध्ये तिकिट काढण्यासाठी फोनपे, गुगलपेच्या माध्यमातून तिकीटाचे पैसे देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र ऑनलाइन पेमेंटच्या या जमान्यात एसटीच्या 34 हजारांपैकी सुमारे 14 ते 15 हजार वाहकांना अ‍ॅण्ड्रॉइड इलेक्ट्रिक तिकीट मशिन चालवता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

प्रशिक्षणाची आवश्यकता

युपीआयद्वारे तिकिट काढण्यासाठी प्रवाशांना प्रोत्साहन देणे देखील गरजेचे आहे. यासाठी वाहकांना अ‍ॅण्ड्रॉइड इलेक्ट्रिक तिकीट मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. परंतु महामंडळाच्या वाहतूक विभागातील अधिकार्‍यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. याबाबत महामंडळाची भूमिका जाणून घेण्यासाठी महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) शिवाजी जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ‘ग्रामीण भागात एसटीची जास्त वाहतूक होते. डिजिटल तिकीटचे प्रमाण वाढत आहे’, असा दावा त्यांनी केला.

क्यूआर कोड तिकिटांची आकडेवारी

महिना            क्यूआरद्वारे तिकिटे      महसूल रुपयांत
डिसेंबर 23            66,078              1,81,23,300
जानेवारी 24        1,09,495              3,12,87,187
फेब्रुवारी 24        1,33,154              4,10,70,386
मार्च 24              2,05,961            5, 86,50,787
एकूण                5,14,688             14,91,31,660

डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून मिळणारा तिकीट महसूल थेट एसटीच्या बँक खात्यावर जमा होतो. तसेच तिकिटाच्या फरकाची रक्कम देण्याचे टाळण्यावरून वाहकांकडून होणार्‍या अपहाराच्या प्रकारांनाही आळा बसेल.

Back to top button