मार्चमध्ये राज्यात भाजपचे सरकार येणार ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा सांगितला नवीन मुहूर्त | पुढारी

मार्चमध्ये राज्यात भाजपचे सरकार येणार ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा सांगितला नवीन मुहूर्त

जयपूर, पुढारी ऑनलाईन

येत्या मार्चमध्ये महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जयपूरमध्ये केला. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडी गतीमान झाल्या असताना आता राज्यातील सत्तांतराबाबत राणे यांनी भाष्य केल्याने अनेकांचे कान टवकारले आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अनेकदा सरकार पडेल असे भाकित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. मात्र, आता या दोनही नेत्यांनी आम्ही विरोधी पक्षाची भूमिका निभावू असे सांगून सरकार पाडण्याबाबतची सगळी शस्त्रे म्यान केली होती. मात्र, राणे यांनी पुन्हा एकदा भाजपच्या अपेक्षांना पालवी फुटेल असे वक्तव्य केले आहे.
काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. पाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीला गेले आहेत.

महाराष्ट्रातील भाजपचे अनेक नेते कालपासूनच दिल्लीत दाखल झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कालच भेट घेतली. त्या बैठकीला देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार होते. मात्र, ते उशिरा दिल्लीत पोहोचले. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी संघटनमंत्री बी. एल. संतोष यांची भेट घेतली.

शिवसेनेच्या एका महत्त्वाच्या नेत्याने दिल्लीत चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जयपूरच्या दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी मार्चमध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजपचे सरकार येईल असा दावा केला. त्यानंतर त्यांच्यावर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे. परब यांनी राणेंच्या विधानाची खिल्ली उडवत असे अनेक मुहूर्त दिले पण घडले काहीच नाही, असे ते म्हणाले.

तर नवाब मलिक यांनी खोचक शब्दांत टीका करत ट्विट केले आहे. ‘काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय…’

हेही वाचा : 

Back to top button