अश्विनी बिद्रे हत्याकांड : सर्व सर्टिफिकेटस् मीच करून सहीदेखील मीच केली आहे | पुढारी

अश्विनी बिद्रे हत्याकांड : सर्व सर्टिफिकेटस् मीच करून सहीदेखील मीच केली आहे

पनवेल ः सहायक पोलिस निरीक्षक आश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी गुरुवारी पनवेल येथील जिल्हा सत्र न्यायालयात न्यायमूर्ती माधुरी आनंद यांच्या समोर आयडियाचे नोडल ऑफिसर विजय शिंदे यांची साक्ष नोंदविण्यात आली. या हत्याकांडातील आरोपी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांनी मोबाईल घेताना दिलेले पेपर मी पाहिले आहेत. ते खरे असून 65 बी चे प्रमाणपत्र देखील मीच तयार केले आणि स्वाक्षरी देखील मीच केली, अशी साक्ष शिंदे यांनी न्यायालया समोर दिल्याची माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील अ‍ॅड.प्रदीप घरत यांनी दिली आहे.

नोडल ऑफिसर विजय शिंदे हे अर्धांगवाताचा झटका आल्यामुळे, कोर्टात साक्ष देऊ शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत व्होडाफोनचे नोडल ऑफिसर यांची उलटतपासणी घेण्यात आली होती. त्यानुसार हत्येचा दिवशी मुख्य आरोपी निलंबित पोलीस अधिकारी कुरुंदकर यांचे मित्र सह आरोपी राजू पाटील हा देखील कुरुंदकर यांच्या घरी 12 मिनिटे उपस्थित होता, असा पुरावा आणि खुलासा या उलट तपासणीत समोर आला होता.

या उलटतपासणी नंतर आरोपी वापरत असलेल्या मोबाईलच्या कंपनीचे चौकशीसाठी आयडियाच्या नोडल ऑफिसरची साक्ष नोंदवणे गरजेचे असल्याचे मत विशेष सरकारी वकील अ‍ॅड. घरत यांनी नोंदविले होते. त्यावेळेस नोडल ऑफिसर विजय शिंदे यांना अर्धांगवाताचा झटका आला असल्यामुळे न्यायालयात ते हजर होऊ शकत नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र, न्यायमूर्ती आनंद यांनी शिंदे यांना मेडिकल फोर्समध्ये न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार गुरुवारी मेडिकल फोर्समध्ये त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांची साक्ष नोंदवण्यात आली. शिंदे यांना डिसीपी झोन-2 यांनी पाठविण्यात आलेली तीन पत्रे दाखविली, ती त्यांनी पाहिली व ओळखली, आणि कोर्टाला माहिती दिली की त्या पत्राप्रमाणे मी डीसीपी झोन-2 यांना सीडीआर पाठविले. त्या पत्रावरील सील शिक्का, स्वाक्षरी ही मीच केली आहे. तसेच महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांनी फोन घेताना दिलेली कागदपत्रे देखील मी पाहिली आणि खरी आहेत.

महेश फळणीकर वापरत असलेल्या आयडिया मोबाईलचे सीडीआर असलेल्या 23 पानांवर स्वाक्षरी शिक्का, सिल आणि कुंदन भंडारी याच्या सीडीआरचे एक पान यावर स्वाक्षरी शिक्का मीच केले आहे, असे शिंदे यांनी न्यायालयासमोर सांगितले. याबाबतची 65 बी सर्व सर्टिफिकेट्स मीच तयार केली आणि सही देखील मीच केली आहे,

अशीही माहिती त्यांनी न्यायालयासमोर दिली. या साक्षीनंतर आता पुढील सुनावणी 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान सुनावणीच्यावेळी राजू गोरे, एसीपी संगीता शिंदे-अल्फान्सो, आरोपी आणि आरोपींचे वकील न्यायालयात हजर होते.

65 बी चे सर्टिफिकेट खोटे : आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद

कोर्टात साक्ष देण्यासाठी हजर असलेले आयडियाचे नोडल ऑफिसर विजय शिंदे यांची आरोपीचे वकील यांची उलट तपासणी घेताना 65 बीची दिलेली सर्टिफिकेट्स खोटी आहेत आणि पोलिसाच्या सांगण्यावरून सीडीआर बनवून दिला, असा आरोपीच्या वकीलाकडून युक्तीवाद करण्यात आला.

Back to top button