एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलंय. सरकार म्हणून लोकांनाही आम्ही जबाबदार आहोत. प्रशासनाचा धाक म्हणून काल निलंबनाची कारवाई झालीय. कुणावरही कारवाई करण्याची सरकारची इच्छा नाही. एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही विनंती करतो की, कर्मचाऱ्यांनी हा संप थांबवावा, असे आवाहन अनिल परब यांनी केले.
हा संप हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवला असल्याचे परब म्हणाले. जे कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. या प्रश्नी काही राजकीय़ पक्ष पोळ्या भाजून घेताहेत. त्यांचा कट झालेल्या पगाराची जबाबदारी हे राजकीय नेते घेणार आहेत का? असा सवालही त्यांनी केला. त्यांनी गोपीचंद पळकर, सदाभाऊ खोत यांच्यावरही टीका केली. हे नेते कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेतात का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करण्याची मागणी १-२ दिवसांची नाही. त्रिसदस्यीय समितीला १२ आठवड्यात अहवाल सादर करावा लागणार आहे. एसटी महामंडळ आर्थिक संकटात आहे. तरीही कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात आले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांवर बोललो आहे. काही मागण्यांवर तोडगा काढू. उच्च न्यायालयाचा अवमान करू नका. कामावर हजर व्हा, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याचं लेखी हायकोर्टत दिलंय. अभ्यास करण्यासाठी समिती नेमली आहे. भाजपचे काही नेते या आंदोलनाला खतपाणी घालताहेत. भाजप नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. असे आवाहनही त्यांनी केले.