

खासगी ट्रॅव्हल्स चालकांना सीएसटी स्थानकातून गाड्या सोडण्यात परवानगी देऊन शासनाने आज एसटी स्थानकात सवत आणली आहे. असे सांगत एसटी कर्मचाऱ्यांनी आज (दि.१०) सकाळी साडे अकराच्या सुमारास जागरण गोंधळ घातला. (Pune ST Bus Strike)
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. हे लक्षात घेऊन, शासनाने स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड, पुणे स्टेशन या स्थानकामधून खासगी ट्रॅव्हल्सला प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे.
त्यामुळे एसटी चालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी एसटी चालकांनी हा जागरण गोंधळ घातला असल्याचे एसटी चालकांनी सांगितले. (Pune ST Bus Strike)
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेत शासनाने मंगळवारी रात्री एसटीच्या स्थानकांमधून खासगी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बुधवारी म्हणजेच आजपासून स्वारगेट स्थानकातून सकाळी आठ वाजल्यापासून खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या सोडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
– (दर तासाला- प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार)
– स्वारगेट एसटी स्थानक -20 गाड्या- (कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, बेळगाव)
– शिवाजीनगर (वाकडेवाडी) – 20 गाड्या (अकोला, जालना, रावेत)
– पुणे स्टेशन – 20 गाड्या (मुंबई, दादर, बोरिवली, कांदिवली)
– पिंपरी – 20 -(कोकण भागातील रत्नागिरी, दापोली, खेड, सावंतवाडी, महाड)
– पुण्यातून एकूण – 60 गाड्या
– पिंपरीतून दर तासाला 20 खासगी गाड्या सुटणार
पीएमपीच्या गाड्याही ग्रामीण भागात धावणार
एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल लक्षात घेत, प्रशासनाने पीएमपीलाही महापालिका हद्दी शेजारील ग्रामीण भागात बससेवा पुरविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संप काळात पीएमपी आता ग्रामीण भागात आजपासून प्रवाशांना सेवा पुरविणार आहे. एसटीच्या पुण्यातील तीनही स्थानकांतून उद्यापासून (दि.10) खासगी वाहतूक दारांच्या बस प्रवाशांच्या सोयीकरिता सोडण्यात येणार आहे. त्याचे सर्व नियोजन आरटीओ आणि खासगी वाहतूकदारांकडे आहे. त्याचे भाडे एसटीच्या दरात असणार आहे. पुण्यातील तीनही स्थानकातून प्रत्येकी 20 गाड्या सुटणार आहेत. काही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिस बंदोबस्त असणार आहे.
– रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, एसटी पुणे विभाग