Nanded Children Death : नांदेडच्या सरकारी रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्ण दगावले; मृतांमध्ये १२ अर्भकांचा समावेश | पुढारी

Nanded Children Death : नांदेडच्या सरकारी रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्ण दगावले; मृतांमध्ये १२ अर्भकांचा समावेश

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासांत 12 नवजात अर्भकांचा व 12 इतर रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्णालयातील बालकांसह 70 रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. औषधांच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. मृतांपैकी बहुतांश जण हे सर्पदंश आणि विष प्राशन केलेले रुग्ण असल्याचे समोर आले आहे. (Nanded Children Death)

विष्णुपुरी परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गेल्या 24 तासांतील 24 मृत्यूंच्या धक्कादायक प्रकारामुळे सोमवारी राज्यभरात खळबळ उडाली. राज्याचा वैद्यकीय शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांनी या घटनेची नोंद घेतली असून, मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. रुग्णालयातील लहान बालकांसह 70 रुग्ण गंभीर स्थितीत असल्याची माहिती काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सायंकाळी दिली.
या रुग्णालयात 24 तासांत 6 मुले व 6 मुली या 12 बालकांसह इतर 12 रुग्ण दगावल्याची माहिती सोमवारी दुपारी बाहेर आली. मृतांमध्ये सर्पदंशाचे, विष प्राशन केलेले व इतर आजारांचेही रुग्ण होते. त्यात 7 स्त्रिया आणि 5 पुरुषांचा समावेश असून, काही रुग्ण परराज्यातील असल्याचे सांगण्यात आले.

सर्पदंशावरील औषधाचा तुटवडा

सर्पदंश झालेल्या रुग्णांवरील उपचारासाठी हाफकिन संस्थेकडून मिळणारे औषध मागील काही दिवसांपासून नियमितपणे मिळत नसल्यामुळे रुग्ण दगावत असल्याचे सांगण्यात आले. औषध पुरवठ्यासंबंधीच्या तक्रारीला महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी दुजोरा दिला.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सायंकाळी 5 नंतर रुग्णालयात धाव घेतली. अधिष्ठाता व इतर वरिष्ठ डॉक्टरांकडून त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली. 24 तासांत 24 रुग्ण दगावल्याच्या माहितीला दुजोरा मिळाला, तरी डॉक्टर किंवा इतर कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाले नसल्याचे ठासून सांगितले गेले. सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींपैकी सायंकाळपर्यंत कोणीही रुग्णालयाकडे फिरकले नव्हते. रुग्णालय परिसरात फारशी वर्दळही नव्हती. दगावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांपैकी कोणीही तक्रार करण्यासाठी समोर आलेला नव्हता. पण काँग्रेसच्या नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. हे वृत्त लिहीत असेपर्यंत मृत झालेल्या रुग्णांची नावे महाविद्यालय प्रशासनाने जाहीर केेलेली नव्हती.

दहा वर्षांपूर्वी स्थलांतर

सुमारे 10 वर्षांपूर्वी या रुग्णालयाचे विष्णुपुरी परिसरातील सुसज्ज इमारतीत स्थलांतर करण्यात आले होते. त्यावेळी खाटांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. प्रारंभीची काही वर्षे रुग्णांना चांगली आणि तत्पर सेवा मिळत होती. परंतु मागील काही वर्षांपासून रुग्णालयाचे व्यवस्थापन ढेपाळले आहे. रुग्णालयातील वॉर्डांची दुरवस्था झाली असून स्वच्छताही होत नसल्याचे एका जबाबदार अधिकार्‍याने सांगितले. वॉर्डांमधील रुग्णांना वरिष्ठ डॉक्टर्स वेळच्यावेळी बघत नाहीत. कनिष्ठ डॉक्टरांवर रुग्णसेवा सोडून देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. प्रशासन अत्यवस्थ अन् शेवटच्या क्षणी रेफर झालेल्या रुग्णांचा मृतांमध्ये समावेश असल्याचा दावा रुग्णालयाने केला.

वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर हे पूर्वी अधिष्ठाता होते; परंतु आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या जबाबदारीतून ते मुक्त झाल्यानंतर शासनाने त्यांची नियुक्ती मुंबईतच संचालनालयात केली. मधल्या काळात प्रभारी अधिष्ठातांवर कारभार चालविण्यात आला. सध्या डॉ. एस. आर. वाकोडे यांच्याकडे हा पदभार आहे.

रुग्णालयात अपुरे मनुष्यबळ

या रुग्णालयाची रोजची ओपीडी साधारणत: दोन हजारांवर आहे. या ठिकाणी नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिम अन् शेजारील तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. रुग्णांची संख्या वाढत असताना औषधांच्या तुटवड्याचा विषयही गंभीर होत चालला आहे. रुग्णांना बाहेरून औषधे आणण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णसंख्येच्या तुलनेत डॉक्टर्स, परिचारिकांसह इतर वेगवेगळ्या दर्जाच्या कर्मचार्‍यांचा प्रचंड तुटवडा आहे. अनेक जागा रिक्त आहेत. उपचारांचा भार पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या तसेच कंत्राटी तत्त्वावर काम करणार्‍या डॉक्टरांवर ताण पडला असल्याची माहिती देण्यात आली.

हेही वाचा

Back to top button