खासगी रुग्णालयांसाठी नियमावली करणार : हसन मुश्रीफ | पुढारी

खासगी रुग्णालयांसाठी नियमावली करणार : हसन मुश्रीफ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  रुग्णालयात आकारण्यात येणारे बिल, त्याकरिता रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा त्रास, या सर्व पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांसाठी नियमावली तयार करण्याचा विचार असून याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाची बैठक घेतली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी कोल्हापुरात सांगितले.

शेंडा पार्क येथे राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नव्याने होणार्‍या रुग्णालयासाठी मुश्रीफ यांनी जागेची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, खासगी रुग्णालयात बिलावरून अनेकदा रुग्णांना डिस्चार्ज दिला जातो. त्यामुळे पुढील उपचारासाठी रुग्णांना शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागते. पैसे नाहीत म्हणून खासगी रुग्णालयांना उपचार टाळता येणार नाहीत, याबाबत काही नियमावली आवश्यक आहे.

मुश्रीफ म्हणाले, खासगी रुग्णालयात रुग्णालयात बिलावरून अनेकदा गोंधळ होतो. पैसे भरले तर ठिक नाही तर काही वेळा उपचार थांबवले जातात, अशा काही घटना घडल्या आहेत. अशावेळी रुग्णाला शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो. अशा प्रकारात उपचाराच्या शेवटच्या टप्प्यात रुग्णालय हात झटकते, रुग्ण गंभीर आहे असे सांगितले जाते. ही सगळी उठाठेव फक्त पैशासाठीच होत असते. मात्र, पैसे नाहीत म्हणून जर खासगी रुग्णालयांनी उपचारासाठी टाळाटाळ केली तर कारवाई करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

याबाबत खासगी रुग्णालयासाठी काही नियमावली तयार करता येईल का, याकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग यांची लवकरच संयुक्त बैठक घेणार आहे. खासगी रुग्णालयांसाठी रुग्ण नियमावली तयार केल्याशिवाय त्यांना चाप बसणार नाही, असेही मुश्रीफ म्हणाले. यावेळी अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे उपस्थित होते.

Back to top button