Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटीबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही | पुढारी

Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटीबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटीबद्ध आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी आज (दि.१४) अंतरवाली सराटीत दिली. गेल्या १७ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची शिंदे यांनी आज भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अंतरवाली सराटीत आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी फळाचा रस घेऊन उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री शिंदेंसह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे आणि अर्जुन खोतकर आदी आंदोलनस्थळी हजर होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठा समाजासाठी जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे. ज्यांचा हेतू चांगला आहे त्याला जनता आणि सरकारही पाठींबा देते. जालना येथे लाठीचार्जची घडलेली घटना दुर्दैवी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माफी मागितली आहे. मराठा समाज शिस्तप्रिय आहे. लाठीमारीची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत गावकऱ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

सुप्रिम कोर्टाने आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी काढल्या त्यावर काम सुरू आहे. जी भावना मनोज पाटील यांची आहे, तीच सरकारची आहे. मराठा समाजाची फसवणूक करणार नाही. सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे की, मराठा समाजाचं गेलेलं आरक्षण आणि टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे, ही ठाम भूमिका आहे. मनोजची तब्बेत बिघडू नये, यासाठी त्याने वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत. दोन-तीन दिवस तब्बेत चांगली कर; तब्बेत चांगली झाली की आंदोलन कर. सरकार देणारं आहे. मी देखील शेतकरी कुटुंबात जन्मलेलो आहे. मला तुमच्या भावनांची जाणीव आहे. माझे बाबा मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाले होते, असेही शिंदे म्हणाले.

मी असा माणूस आहे का? ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर शिंदेंचे स्पष्टीकरण

काल व्हायरल झालेल्या व्हिडिओवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आजही अंतरवाली सराटीत खुलासा केला. ते म्हणालेकी, “पत्रकार परिषदेचा शेंडा- बुडका काढला आणि व्हिडिओत फक्त मधला भाग घेतला. माध्यमांकडून हा विश्वासघात झाला. त्या रात्री साडेबारापर्यंत मिटींग झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत आम्ही येत होतो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, आजच्या पत्रकार परिषदेत प्रश्न-उत्तर नकोत. मी पण म्हणालो की, प्रश्न-उत्तर नको आणि राजकीय पण नको, जे आपल्या मिटींगमध्ये ठरलंय, जे ठरलेलं आहे तेवढच बोलायचं आणि निघायचं. यांनी मात्र व्हिडिओत फक्त मधलेच दाखवलं. मी असा माणूस आहे का? मी प्रामाणिकपणे सांगतो की, आम्ही सर्वजण मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे,” असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Back to top button