शेतकर्‍यांचे पीक कर्ज व्याज सवलतीचे 19 कोटी थकीत ; सरकारकडून रक्कम येण्याचे प्रमाण संथच | पुढारी

शेतकर्‍यांचे पीक कर्ज व्याज सवलतीचे 19 कोटी थकीत ; सरकारकडून रक्कम येण्याचे प्रमाण संथच

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (पीडीसीसी) घेतलेल्या पीक कर्जाची मुदतीत परतफेड करुनही शेतकर्‍यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत रक्कम बँक खात्यावर जमा झालेली नाही. आर्थिक वर्ष 2022-23 मधील राज्य सरकारकडून अद्यापही सुमारे 19 कोटी रुपये थकीत असल्याने शेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही रक्कम शासनाकडून कधी प्राप्त होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारमार्फत डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सन 2022-23 मध्ये चालू वसूलपात्र पीककर्जाची शासनाने दिलेल्या मुदतीत संपूर्ण परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना तीन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावर तीन टक्के दराने व्याज सवलत देण्यात येते.

संबंधित बातम्या : 

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मार्च 2023 अखेर व्याज सवलतीचे 35 कोटी 60 लाख 34 हजार रुपये येणे बाकी होते. त्या व्याज सवलत योजनेच्या रक्कम मागणीचा प्रस्ताव जिल्हा बँकेने शासनाकडे दाखल केला होता. त्यापैकी 16 कोटी 50 लाख रुपये प्राप्त झालेले आहेत. उर्वरित सुमारे 19 कोटी रुपये अद्याप येणे बाकी असल्याची माहिती पीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई यांनी दिली. दरम्यान, केंद्र सरकारने देशात नोटाबंदी लागू केल्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुमारे 22 कोटी 25 लाख रुपयांच्या जुन्या नोटा अद्याप बदलून मिळालेल्या नाहीत. या बाबत जिल्हा बँकेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असून त्यावरील निर्णय प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.

अजित पवार, दिलीप वळसे पाटील आज उपस्थित राहणार…
जिल्हा बँकेची 106 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (दि.18) दुपारी एक वाजता अल्पबचत भवन येथे होणार आहे. बँकेचे संचालक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह संचालक मंडळ व जिल्ह्यातील बँकेचे सभासद, विकास संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित राहणार आहेत. सभेत थकीत व्याज सवलत योजनेच्या रक्कमेचा मुद्दा शेतकर्‍यांकडून मांडला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विजेत्या विकास संस्थांची नांवे कळविण्याचा विसर
जिल्हा बँकेची वार्षिक सभा सोमवारी होत असल्याची माहिती बँकेकडून पत्रकाद्वारे कळविण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील उल्लेखनीय काम करणार्‍या व पुरस्कार प्राप्त विकास संस्थांची नांवे कळविण्याचा विसर जिल्हा बँक प्रशासनाला पुन्हा एकदा पडला आहे. त्यामुळे वार्षिक सभेवेळीच कोणत्या संस्थांना पुरस्कार जाहिर झाले हे सर्व सभासदांना आता कळणार आहे.

हेही वाचा :

Back to top button