माझे नाव ज्ञानेश्वर वानखेडे…बायको लाडाने दाऊद म्हणायची | पुढारी

माझे नाव ज्ञानेश्वर वानखेडे...बायको लाडाने दाऊद म्हणायची

पुढारी ऑनलाईन डेस्क

क्रूझ पार्टीवर छापा टाकल्यानंतर अडचणीत आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी धर्मावरून खुलासा केला आहे. माझे नाव ज्ञानेश्वर असून बायको लाडाने दाऊद म्हणायची, असा खुलासा त्यांनी केला आहे. समीर वानखेडे यांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविल्याचा आरोप नबाब मलिक यांनी केल्यानंतर त्यावरून वादंग उठले आहे. वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामाही मलिक यांनी शेअर केला आहे.

याबाबत समीर यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझ्या सर्व्हिस बुकवर ज्ञानदेव वानखेडे अशीच नोंद आहे. समीर आणि त्याच्या पत्नीचे लग्न मुस्लिम पद्धतीने झाले.

काही काळानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर त्यांचा कायदेशीर पद्धतीनं घटस्फोट झाला. ड्रग्ज प्रकरणाशी माझा, माझ्या जातीचा, धर्माचा, नावाचा काय संबंध? असा प्रतिसवाल त्यांनी केला. समीरच्या आईने त्यावेळी काय सांगितले मला माहीत नाही.

सध्या व्हायरल होत असलेला निकाहनामा खरा असेल तर नेमकं काय झालेय मला माहीत नाही. हा निकाहनामा खरा असेलही. निकाह लागण्यावेळी समीरच्या आईनं काय सांगितलं हे मला माहिती नाही.

हे लग्न व्हावे म्हणून समीरच्या आईने आम्ही दोघेही मुस्लिम असल्याचे सांगितले असावे. मुस्लिम धर्मात जर आई वडील वेगवेगळ्या धर्माचे असतील तर त्यांचे लग्न होत नाही. मात्र, समीरच्या लग्नासाठी असे केले असावे.

फेसबुकवर जे दाऊद वानखेडे अकाउंट आहे ते खोट्या पद्धतीने बनविलेले आहे. लोक प्रेमानं कुठल्याही नावाने हाक मारतात. समीरने ज्या कोट्यातून नोकरी मिळविली आहे, त्याच धर्माचे आम्ही आहोत. कुणाचाही हक्क त्याने हिरावला नाही.

मुंबई पोलिसांची एंट्री

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede Case) यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. त्यांच्याविरोधातील आरोपांची आता मुंबई पोलिस चौकशी करणार आहेत. त्यासाठी मुंबई पोलिसांनी सहाय्यक पोलिस आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. मुंबईतील चार पोलिस स्थानकात वानखेडे यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या असल्याची माहिती आहे. दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी दोन ट्विट केले. त्यात समीर वानखेडेंच्या पहिल्या विवाहाबाबत अजून एक गौप्यस्फोट केला. ट्विटमध्ये नवाब मलिक म्हणाले की, “समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह ७ डिसेंबर २००६ रोजी लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी येथे झाला होता. या निकाहामध्ये ३३ हजार रुपयांचा मेहेर देण्यात आला. तसेच समीर वानखेडेंची बहीण यास्मिन दाऊद वानखेडे हिचे पती अझीझ खान हे साक्षीदार क्रमांक २ होते”.

Back to top button