Wankhede Vs Malik : नवाब मलिकांना लाज वाटली पाहिजे : क्रांती रेडकर | पुढारी

Wankhede Vs Malik : नवाब मलिकांना लाज वाटली पाहिजे : क्रांती रेडकर

मुंबई; पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे (Wankhede Vs Malik) यांच्या विवाहाबाबत गौप्यस्फोट केल्यानंतर समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा प्रत्यक्ष विवाह करणारे काझी आता माध्यमांसमोर आले आहेत. “वानखेडेचं संपूर्ण कुटुंब मुस्लीम आहे. त्याचे आई, वडील, बहीण, मुलीकडचे सर्वजण मुस्लीम आहेत. धर्माबाबत वानखेडे हे खोटं बोलत आहेत”, असे स्पष्टीकरण काझी मुजम्मिल अहमद यांनी दिले आहे.
यावर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर म्हणाल्या की, “माझे पती हिंदू आहेत आणि ते अजूनही हिंदू आहे. ते काझी कोर्टापेक्षा मोठे नाहीत. नवाब मलिक यांनी कोर्टात जावं आणि ते पुरावे दाखवावेत. माझ्या लग्नाचं राजकारण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे”, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. तर वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी माध्यमांना सांगितले की, “नवाब मलिक यांनी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात जाता कामा नये. दाऊत हे नाव प्रेमानंही घेतलं जाऊ शकतं”, असं समीर वानखेडे यांच्या वडिलांना माध्यमांना सांगितलं.
नवाब मलिक (Wankhede Vs Malik) यांनी आज सकाळी दोन ट्विट केले. त्यात समीर वानखेडेंच्या पहिल्या विवाहाबाबत अजून एक गौप्यस्फोट केला. ट्विटमध्ये नवाब मलिक म्हणाले की, “समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह ७ डिसेंबर २००६ रोजी लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी येथे झाला होता. या निकाहामध्ये ३३ हजार रुपयांचा मेहेर देण्यात आला. तसेच समीर वानखेडेंची बहीण यास्मिन दाऊद वानखेडे हिचे पती अझीझ खान हे साक्षीदार क्रमांक २ होते”, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत नवाब मलिकांनी त्यांना अडचणीत आणलं आहे.  यापूर्वी नवाब मलिक यांनी एनसीबीमधील एका अधिकाऱ्याचे निनावी पत्र शेअर करत समीर वानखेडे यांची कार्यपद्धती आणि त्यांनी केलेल्या २६ कारवायांवर प्रश्न उपस्थित केले. एनसीबीमधील एका अधिकाऱ्याने पाठवलेल्या निनावी पत्रामधील मजकूर मी ट्विटरवरून प्रसिद्ध केला आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे पत्र डीजी नार्कोटिक्स यांना पाठवणार आहे. आता समीर वानखेडेच्या चौकशीमध्ये हे पत्र समाविष्ट करण्याची विनंती मी केली आहे”, असेही नवाब मलिक यांनी म्हंटलं होतं.
समीर वानखेडे यांनी तपास केलेल्या २६ खटल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच वानखेडे यांच्या टीममधील काही अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आले आहेत. समीर वानखेडे हे प्रसिद्धीलोलूप अधिकारी आहेत. त्यांना माध्यमांमध्ये चर्चेत राहणे आवडते. समीर वानखेडे यांनी अनेक निर्दोष लोकांना बनावट एनडीपीएस केसमध्ये अडकवले आहे, असा दावा या पत्रातून करण्यात आला होता.

Back to top button