नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Road Accident : देशात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या सामाजिक आर्थिक नुकसानासंबंधी एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. वाहनांचे खुले पार्ट बनवणाऱ्या बोश इंडियाच्या अपघात संशोधन पथकाने गेल्या दोन दशकांमध्ये झालेल्या अपघातांच्या आकडेवारींचे विश्लेषण करीत रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या नुकसानासंबंधीचा अहवाल तयार केला आहे.
या अहवालानूसार रस्ते अपघातांमुळे देशाला वर्षाकाठी २.९१ लाख कोटींचे नुकसान होत असल्याची माहिती समोर आली आहे.
अभ्यासानूसार भारतात वर्षाकाठी रस्ते अपघातांमुळे १५.७१ अब्ज ते ३८.८१ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास १.१८ ते २.९१ लाख कोटी रूपयांचे सामाजिक आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची आकडेवारी समोर आली.
ऍक्सीडेन्ट सॅम्पलग सिस्टम ऑफ इंडियाच्या नुसार २०१९ मध्ये ७ लाख ८१ हजार ६६८ वाहने अपघातग्रस्त झाले. यात ०.५७ ते १.८१ अब्ज डॉलर म्हणजे जवळपास ४ हजार ३०० ते १३ हजार ५०० कोटींचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.अहवालानूसार बसेस अपघातग्रस्त झाल्याने १४० कोटींचे नुकसान झाले. तर, दुचाकी वाहनांच्या उत्पादकतेला ८१ हजार ८०० कोटींचा फटका बसल्याचा दावा अहवालातून करण्यात आला आहे.