समीर वानखेडे : मुंबईमधील आरोपांची वात दिल्लीत जाऊन पेटली ! | पुढारी

समीर वानखेडे : मुंबईमधील आरोपांची वात दिल्लीत जाऊन पेटली !

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

क्रुझवरील छापेमारीप्रकरणी दाखल गुन्ह्यातील पंचानेच केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात केलेल्या गंभीर आरोपांची गंभीर दखल एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने घेतली आहे. एनसीबीने या आरोपांच्या चौकशीसाठी तीन अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे.

समीर वानखेडेंना तातडीने दिल्लीला बोलावले आहे. वानखेडे यांची दिल्लीत खात्यांतर्गत चौकशी होणार असून त्यासाठीच त्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आल्याचे एनसीबीचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले.

एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाकडून गंभीर दखल

क्रुझवरील छापेमारी प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईल याने एक व्हिडीओ व्हायरल करून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुलगा आर्यन याला सोडण्यासाठी शाहरुख खान याच्याकडून 25 कोटींची मागणी करण्यात आली होती. 18 कोटींवर तडजोड करुन यातील 08 कोटी रुपये वानखेडेंना मिळणार होते, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला आहे. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली असून एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने या आरोपाची गंभीर दखल घेतली आहे.

पंच प्रभाकर साईल याने एक प्रतिज्ञापत्र लिहिले असल्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी सोमवारी सकाळी न्यायालयात धाव घेत दोन प्रतिज्ञापत्र सादर केली आहे. तसेच, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जन्म दाखला खोटा आहे. या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात चॅलेंज करणार आहे, असा इशारा वानखेडे यांनी दिला आहे.

माझ्या मूळ गावी जा आणि तपासा. माझा म्हणून जो जन्म दाखला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जात आहे, तो खोटा आहे. माझ्याविरोधात खोडसाळ प्रकार सुरू आहे. त्याला मी कायदेशीर उत्तर देणार आहे. याबाबत आपण लवकरच जाहीर खुलासा करणार आहे, असे वानखेडे यांनी सांगितले.

दरम्यान, वानखेडे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे. आपल्या कुटुंबीयांनाही धोका आहे. त्यामुळे संरक्षण देण्याची मागणी साईल याने केली आहे. साईल याने सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजता थेट मुंबई पोलीस मुख्यालय गाठले.

पोलीस मुख्यालयात गुन्हे शाखेचे प्रमुख मिलिंद भांबरे यांना त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. यावेळी त्यांनी एक निवेदनही देत आपल्याला आणि कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच क्रुझवरील रेडपूर्वी आणि नंतर काय काय घडले याची माहितीही साईलने पोलिसांना दिली आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button