KP Gosavi : आर्यन खानने विनंती केल्‍यानंतरच फाेन केला : केपी गोसावींचा दावा | पुढारी

KP Gosavi : आर्यन खानने विनंती केल्‍यानंतरच फाेन केला : केपी गोसावींचा दावा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी दररोज नवे धक्‍कादायक खुलासे होत आहेत. त्‍याचबरोबर आरोप-प्रत्‍यारोपाचाही फैरी झडत आहेत. अशातच या प्रकरणातील साक्षीदार केपी गोसावी यांनी आणखी एक खुलासा केला आहे. ड्रग्‍ज प्रकरणी ताब्‍यात घेतल्‍यानंतर आर्यन खान याने आईवडिलांशी बोलायचे आहे, त्‍यांना फोन करा, अशी विनंती माझ्‍याकडे केली होती, असा दावा केपी गोसावी( KP Gosavi) यांनी केला आहे. तसेच याप्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने केलेले सर्व आरोप निराधार असल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटलं आहे.

आर्यन खानसोबतची सेल्‍फी व्‍हायरल झाल्‍याने केपी गोसावी हे चर्चेत आले होते. रविवारी गोसावी यांच्‍या अंगरक्षक प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे आणि केपी गोसावी यांच्‍यावर गंभीर आरोप केले. आर्यन खानची सुटका करण्‍यासाठी २५ कोटींचे लीड झाले होते. यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना देण्‍यात येणार होते, असा दावा साईल यांनी केला होता.

११ ऑक्‍टोबर पासून साईलच्‍या संपर्कात नाही

‘इंडिया टूडे’शी बोलताना केपी गोसावी यांनी सांगितले की, प्रभाकर साईल याला मी ओळखतो. तो माझ्‍याबरोबरच काम करत होता. त्‍याने कोणत्‍या स्‍वरुपाचे आरोप केले आहेत हे मला माहित नाही. ११ ऑक्‍टोबरपासून मी त्‍याच्‍या संपर्कात नाही.

माझ्‍या जीवाला धोका

माझ्‍याविरोधात पुणे जिल्‍ह्यात एक गुन्‍हा दाखल आहे. अचानक या प्रकरणी तपास सुरु झाला आहे. पोलिस माझा शोध घेत आहेत. माझ्‍या जीवाला धोका आहे. तसेच मला जीवे मारण्‍याची धमकीचे मेसेजही येत असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटलं आहे. ६ ऑक्‍टोबरपासून आपण एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखडे यांच्‍या संपर्कात नाही, असेही त्‍यांनी सांगितले.

पुणे पोलिसांकडून गोसावींचा शोध सुरु

दरम्‍यान, परदेशात नोकरीच्‍या आमिषाने तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी २०१८ मध्‍ये गोसावीविरोधात पुणे पाेलिसात गुन्‍हा दाखल झाला होता. मलेशियात नोकरी देण्‍याचे आमिष दाखवून त्‍याने तरुणाकडून ३ लाख रुपये लाटल्‍याचे तक्रारीमध्‍ये म्‍हटलं होते. आता गोसावी यांचा शोध घेण्‍यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं तयार केली आहेत. मात्र गोसावी हे याचे लोकेशन मिळत नाही. त्‍यामुळे आता अन्‍य राज्‍यातही त्‍यांचा शोध घेतला जात असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचलं का?

 

Back to top button