आमदार बच्चू कडूंना मंत्री दर्जा; विस्तार लांबणीवर? | पुढारी

आमदार बच्चू कडूंना मंत्री दर्जा; विस्तार लांबणीवर?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा, आमदार बच्चू कडू यांची मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात असताना त्यांना मंत्रिपदाऐवजी मंत्री दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर पडणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

दिव्यांग कल्याण खात्याचे नवे अभियान दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी या अभियानाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यासाठी त्यांना मंत्री दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, बच्च कडू यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा जाहीर करण्यात आला असून, याबाबतचे परिपत्रक शासनाकडून काढण्यात आले आहे. दिव्यांगांच्या प्रश्नावर बच्चू कडू हे गेल्या काही वर्षांपासून लढा देत आहेत. त्यांच्या प्रयत्नाने राज्यात दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्यात आला आहे.

राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा असून, त्यात या विभागाचा कार्यभार मुख्यमंत्री कडू यांच्याकडे देतील, अशी चर्चा आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार तोंडावर आला असल्याचे बोलले जात असताना मंत्रिपदाचा दर्जा बहाल करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Back to top button