हनीट्रॅपमध्ये अडकले कोल्हापुरातील व्यापारी; तरुणीसह टोळक्याने चित्रनगरी परिसरात नेऊन लुटले | पुढारी

हनीट्रॅपमध्ये अडकले कोल्हापुरातील व्यापारी; तरुणीसह टोळक्याने चित्रनगरी परिसरात नेऊन लुटले

कोल्हापूर : दिलीप भिसे

अनोळखी तरुणीच्या एका फोनवर गडी भुलला. त्यांच्यात मैत्री झाली. फेसबुकवर ती फुलत राहिली. तिच्या रूपवान सौंदर्यावर नुसताच भाळला नाही, फिदा झाला. तिने त्याला निर्जन ठिकाण चित्रनगरी परिसरात सायंकाळला भेटावयास बोलावले. स्वप्ने रंगवत तो चित्रनगरी गाठतो. ती झाडाजवळ प्रतीक्षेत असते. आडोश्याला 3 साथीदार सावज शोधात थांबलेले असतात… बहिणीला निर्जन ठिकाणी बोलावतोस का ? (honey trap kolhapur)

असा जाब विचारत पिटाई होते. बदनामीची भीती घालून रोख रक्कम, किमती दागिने हिसकावून घेऊन तरुणीसह साथीदारही पसार होतात…

कोल्हापुरातल्या चित्रनगरी, मोरेवाडी, शेंडापार्कसह उजळाईवाडी उड्डाणपूल परिसरात सराईत ‘हनीट्रॅप’ टोळीने महिन्यात दहा रंगेलबाजांची धुलाई करून खिसा रिकामा केला आहे. त्यात दोन बड्या व्यावसायिकांसह नोकरदार, तरुणांचा समावेश आहे. लक्ष्मीपुरीतल्या तरुण व्यापार्‍याला ‘दीपा’ नामक तरुणीने साथिदारांच्या सहाय्याने ‘हनीट्रॅप’ मध्ये गुंतवून 90 हजाराला चुना लावला आहे.

honey trap kolhapur : सराईताला लाजवेल, अशी तरुणी भूमिका बजावत आहे

तरुणाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे लेखी अर्जाद्वारे कैफियतही मांडली; पण यंत्रणेकडून ना दाद, ना फिर्याद… ‘हनीट्रॅप’मध्ये आपण फसल्याचे लक्षात आल्यानंतर इचलकरंजी येथील यंत्रमाग कामगार संतोष मनोहर निकम यांनी आठवड्यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सराईताला लाजवेल, अशी तरुणी भूमिका बजावत आहे. गर्भ श्रीमंतासह मोठी उलाढाल असलेल्या व्यक्तीशी मोबाईलद्वारे संपर्क साधायचा.त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे अन् एक दिवस सायंकाळला निर्जन ठिकाणी भेटावयास बोलवायचे…

दहा, बारा दिवसांपूर्वी टोळीने 30 वर्षीय होलसेल विक्रेत्याला हेरले. ‘दीपा’ ला विक्रेत्याचा मोबाईल क्रमांक दिला. तरुणीने त्यास शनिवारी (दि. 9) चित्रनगरी परिसरात बोलावले. विक्रेता नियोजित ठिकाणी वेळेपूर्वी पोहोचला. तरुणीही मोपेडवरून आली. मात्र, तीन अनोळखी तरुणांनी विक्रेत्याला मारहाण केली. बहिणीशी अश्लील बोलल्याचा जाब विचारत खिशातील पैसे, दागिने, मोबाईल हिसकावून घेतला.

दुसर्‍या दिवशी पुन्हा 25 हजारांची मागणी केली. मग विक्रेत्याने एका गटातील म्होरक्यास माहिती दिल्यानंतर म्होरक्याने त्यांची धुलाई केली.

‘हनीट्रॅप’ म्हणजे नेमके काय रे भाऊ…

अनोळखी आणि गर्भश्रीमंत आणि आर्थिक उलाढाल असलेल्या व्यक्तीची गुप्त माहिती काढण्यासाठी सराईत टोळ्यांकडून महिलांचा वापर करून त्याला आपल्या जाळ्यात ओढले जाते. फसव्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यास निर्जन ठिकाणी बोलावून अचानक हल्ला करून लुटमार केली जाते. ‘स्प्लीटकॅम’ मुळे मुलगी बनून गंडविले जाते. एक साफ्टवेअर इंटरनेटवर उपलब्ध आहे. डाऊनलोड केल्यास कोणत्याही मुलीचा चेहरा लावून चॅटिंग करता येते. इंटरनेटवर मुली चॅटिंग करीत असलेल्या अनेक चित्रफिती उपलब्ध आहेत. या चित्रफिती सॉफ्टवेअरद्वारे चॅटिंगला जोडल्या जावू शकतात.

Back to top button