शाळा सुरू होण्यापूर्वी १० दिवस अगोदर मिळणार पाठ्यपुस्तके! | पुढारी

शाळा सुरू होण्यापूर्वी १० दिवस अगोदर मिळणार पाठ्यपुस्तके!

मुंबई; पवन होन्याळकर : राज्यातील पहिली ते आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या 1 कोटी 7 लाख 42 हजार 728 विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी 10 दिवस अगोदरच पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. 4 कोटी 37 लाख प्रतींचा पुरवठा करण्यात येणार आहे.

यंदाचे शालेय वर्ष विदर्भ वगळून सर्व शाळा 15 जूनपासून सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. समग्र शिक्षा अभियानांर्गत मोफत पाठ्यपुस्तक वितरण नियोजन जोरात सुरु आहे. शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेत पाठ्यपुस्तके मिळण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्यात आले आहे, जिल्हानिहाय शाळा व डेपोंच्यामार्फत पाठ्यपुस्तके शाळेत वेळेत पोहोचविण्यासाठी राज्यभरात वितरण सुरू करण्यात असल्याची माहिती समग्र शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी दिली. वर्गनिहाय सर्व पाठ्यपुस्तके यंदा वेळेत विद्यार्थ्यांच्या हाती पडतील असे काटेकोरपणे पाहिले जात आहे.

राज्यभरात 1 कोटी 7 लाख 42 हजार विद्यार्थ्यांना ही पुस्तके पुरवली जाणार आहेत. तर 4 कोटी 37 लाख 41 हजार पाठ्यपुस्तकांच्या प्रती आहेत. 10 माध्यमातून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके पुरवली जाणार आहेत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील जिल्हा परिषदा, नगर परिषदा, महापालिका, कटक मंडळे; तसेच अनुदानित शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.

पाचवीच्या पुढील पुस्तकात धडे, कविता, घटक झाल्यानंतर दोन वह्यांची पाने जोडलेली पुस्तके मिळणार आहेत. खेडोपाड्यातील गरीब मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्याची उनिवा आदी मुद्यांचा विचार करून पाठ्यपुस्तकात वह्यांची पृष्ठे जोडून दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला.

शालेय वर्ष 2023-24 साठी एकूण 4 कोटी 37 लाख प्रतींचा पुरवठा करण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी ही सर्व पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पडतील असे नियोजन करण्यात आले आहे. 5 जूनपर्यंत ही पुस्तके शाळांत पोहोचली जाणार आहेत. त्यानुसार शाळांच्या मार्फत पुस्तके विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत.
– कैलास पगारे, प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद

हेही वाचा : 

Back to top button