बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : रोजच्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी (दि. 21) रोजी येथील ज्येष्ठ नागरिक निवासात श्रमण करमणूक केंद्रात पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह कॅरम खेळण्याचा आनंद लुटला.
येथील कै. रघुनाथ गेनबा बोरावके ट्रस्ट संचलित ज्येष्ठ नागरिक निवासातील श्रमण करमणूक केंद्र, मेहता भोजन कक्षाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पवार येथे सपत्निक आले होते.
या वेळी त्यांनी ज्येष्ठांसोबत वेळ घालवत विरंगुळ्याचे क्षण अनुभवले. येथील श्रमण करमणूक केंद्रात ज्येष्ठांसाठी बुद्धिबळ, कॅरम अशा खेळांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्राचे उद्घाटन झाल्यावर कॅरम व सोंगट्या पाहून पवार यांनीही पत्नी सुनेत्रा यांच्यासह कॅरमच्या खेळाचा आनंद लुटला. प्रतिस्पर्धी सुनेत्रा पवार यांनीही या वेळी आपले खेळातील कौशल्य दाखवून दिले. या वेळी उपस्थितांनीही टाळ्या वाजवत त्यांना दाद दिली.