अहमदनगर जिल्हावासीयांची शिक्षणाप्रती ‘आपुलकी’ 17 कोटींची ! | पुढारी

अहमदनगर जिल्हावासीयांची शिक्षणाप्रती ‘आपुलकी’ 17 कोटींची !

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागात प्राथमिक शाळांना आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अहमदनगर जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या ‘मिशन आपुलकी’ या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या अवघ्या अकरा महिन्यांत सुमारे 17 कोटी रुपये मूल्याचा लोकसहभाग प्राप्त झाला आहे. त्यात ठिकठिकाणी 25 वर्गखोल्यांच्या बांधकामासह एका शाळेला 15 गुंठे जागेचा, तसेच बांधकाम साहित्य, संगणक, टीव्ही संच आदी विविध भौतिक सुविधांचा समावेश आहे. एका अर्थाने जिल्हावासीयांची आपल्या मुलांच्या शिक्षणाप्रती असलेली ‘आपुलकी’ या ‘मिशन’द्वारे अधोरेखित झाली आहे.

‘मिशन आपुलकी’ हा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा लोकसहभागातून शाळेचा विकास यावर आधारित उपक्रम आहे. यात शाळेचे माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, संस्था यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात उपयोगी ठरतील, अशा भौतिक सुविधा शाळांना उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभाग मिळवण्यासाठी गेल्या वर्षी 1 मे 2022 पासून ‘मिशन आपुलकी’ची सुरुवात करण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून व शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरातील प्राथमिक शिक्षकांनी यात मोलाचे योगदान दिले आहे. शिक्षकांनी शाळेच्या विकासाचे महत्त्व आपापल्या भागातील लोकांना पटवून दिले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीच्या रूपाने गावकरी आणि पालकांमध्ये शिक्षक आणि शाळेविषयी विश्वास निर्माण केला.

त्यामुळेच गावागावांतील पालक, गावकरी, माजी विद्यार्थी आपापल्या शाळेसाठी भरघोस मदत घेऊन उभे राहिले. या उपक्रमात ज्या गावातील लोकसहभागातून रक्कम, वस्तू, सुविधा प्राप्त झाली, ती त्याच गावातील शाळेसाठी वापरण्यात आली. 1 मे 2022 पासून सुरू झालेल्या या उपक्रमात 31 मार्च 2023 पर्यंत तब्बल 16 कोटी 96 लाख 29 हजार 654 रुपये मूल्याचा लोकसहभाग ‘आपुलकी’ने प्राप्त झाला. 151 टीव्ही संच, 278 संगणक, 73 प्रिंटर, 70 इन्व्हर्टर, 175 साऊंड सिस्टीम, 185 टॅब, 148 वॉटर फिल्टर आदी वस्तूंचा त्यात समावेश आहे. यातील 128 संगणक संच पुण्यातील लीडरशिप फॉर स्किल्ड एज्युकेशन फाउंंडेशन या संस्थेने दिले आहेत.

औदुंबर क्लास शाळेला 15 गुंठे जागा

विशेष म्हणजे नगर तालुक्यातील अरणगाव येथील औदुंबर गृहनिर्माण सोसायटीने मोक्याच्या ठिकाणी 15 गुंठे जागा विकत घेऊन ती तेथील औदुंबर क्लास या शाळेसाठी जिल्हा परिषदेला बक्षीसपत्र करून दिली. नगर शहराजवळ असल्याने बाजारभावानुसार या जागेची किंमत साडेतीन कोटींहून अधिक असावी. आणखीही मदत घेऊन लोक पुढे येत आहेत, अशी माहिती नगरचे गटशिक्षणाधिकारी बाबूराव जाधव यांनी सांगितले.

जिल्हाभरात 25 शाळा खोल्या

जिल्हाभरात ‘मिशन आपुलकी’ला मिळालेल्या प्रतिसादातून गरज असलेल्या शाळांमध्ये एकूण 25 वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. तसेच ठिकठिकाणी विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे, शाळांना संरक्षक भिंती आदींची बांधकामेही करण्यात आली आहेत.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या प्रयत्नांतून शिक्षकांनी लोकांचा विश्वास संपादन केला आहे. पूर्वी शिष्यवृत्तीच्या यशात नगरचा दहा-अकरावा क्रमांक असे. आता नगर जिल्हा पुणे, सातार्‍यानंतर तिसर्‍या क्रमांकावर आहे. हे सांगत शिक्षक लोकांपर्यंत पोहोचले आणि लोक शाळेपर्यंत. समन्वय वाढला. विश्वास वाढला. त्यातून लोकसहभागाची ‘आपुलकी’ मिळत आहे.

                                                         – भास्कर पाटील,
                                                   शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Back to top button