महिला अत्याचाराबाबत शंभूराज देसाई शांत का? चित्रा वाघ यांचा सवाल | पुढारी

महिला अत्याचाराबाबत शंभूराज देसाई शांत का? चित्रा वाघ यांचा सवाल

सातारा : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढत असतानाही महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि दोन्ही गृह राज्यमंत्री शांत आहेत. त्यांना तोंड उघडायला वेळ नाही. सातारा जिल्ह्यात तर अत्याचाराची मालिका सुरू आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई तुमच्याच जिल्ह्यात अशा घटना घडत आहेत. महिलांवर अत्याचार होत असतानाही तुम्ही तोंड उघडत नाही. तुम्हाला तर गृहमंत्रीपदाचाच विसर पडला आहे. अशी टीका भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

चित्रा वाघ म्हणाल्या, गृहमंत्र्यांकडेे नेमक्या कोणत्या खात्यांचा कारभार आहे हे महाराष्ट्रातील जनतेला कळाले पाहिजे. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढत आहे. मात्र तरीही ना. शंभूराज देसाई यांचे तोंड का बंद आहे? त्यांच्याकडे कोणत्या विभागाचे मंत्रीपद आहे हे त्यांनी तरी आम्हाला सांगावे. राष्ट्रवादी युवकचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याला अजून अटक झालेली नाही. सतेज पाटील काय करत आहेत? येथे आमच्या महिला भगिनींच्या शरिराचे लचके तोडले जात आहे. अशावेळी आरोपींना कडक शिक्षा करण्याची आमची मागणी रास्त नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

सातारा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत महिलांवरील अत्याचाराचे प्रकार घडले आहेत. सोमर्डी, चाफळ, महाबळेश्‍वर, तांबवे, मांडवे, झिरपवाडी येथे हे प्रकार घडले. मात्र, अत्याचारावर शंभूराज देसाई यांनी तोंड उघडले नाही. तुमचे सौजन्य गेले तरी कुठे? असा सवालही वाघ यांनी उपस्थित केला. यावेळी सुरभी भोसले-चव्हाण, सुनिशा शहा व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

डी. एम. बावळेकर यांना आरोपी का करण्यात आले नाही : चित्रा वाघ

महाबळेश्‍वर : महाबळेश्वरच्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व नवजात बालक दत्तकप्रकरणात शिवसेनेचे नेते माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांचा सहभाग असल्याचे दिसत आहे. दत्तक प्रक्रियेदरम्यान ते स्वत: उपस्थित होते. त्यामुळे या प्रकरणात त्यांना आरोपी का करण्यात आले नाही?, असा प्रश्‍न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

महाबळेश्वरच्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व नवजात बालक दत्तकप्रकरणी चित्रा वाघ यांनी शनिवारी महाबळेश्‍वरमध्ये पोलिसांची भेट घेऊन तपासाबाबतची माहिती घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, या प्रकरणात आमचं लक्ष आहे. एवढंच सांगायला मी येथे आली आहे.

डी. एम. बावळेकर यांचे पुत्र सनी उर्फ सत्चित बावळेकर व योगेश बावळेकर हे दोघेही याप्रकरणात आरोपी असून या दोघांमधील एक वकील असल्याची माहिती मिळत आहे. हे दोघे फरार असून पोलिसांना ते अद्यापही मिळाले नाहीत. प्रथमदर्शनी हे चुकीचे कृत्य असताना त्याला समर्थन देणे, लपवणे, पोलिसांना न सांगणे या सगळ्या गोष्टींसाठी बावळेकर यांच्या दोन्ही मुलांना आरोपी करण्यात आले आहे.

त्यांच्यासोबत त्यांचे वडील डी. एम. बावळेकर यांना आरोपी का करण्यात आले नाही? असा प्रश्न आहे. दत्तक प्रक्रियेत मुख्यतः बॉण्ड बनवताना, पूजा होताना, बाळ देताना या सगळ्या वेळी स्वतः डी. एम. बावळेकर उपस्थित होते. त्यांच्या समोरच या सगळ्या गोष्टी झाल्या याची पुष्टी पोलिसांना सीसीटीव्हीमधून मिळू शकते. त्यांच्या समोर हे चुकीचे कृत्य होत असताना त्यांनी पोलिसांना हे कळवले नाही. ते त्याविषयावर बोलले नाहीत.

त्यांनी हा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला मग या सर्व घटनेमध्ये बावळेकर यांना पोलिसांनी आरोपी का केले नाही? संबंधित जंगम, बॉण्ड करणारा यांना बोलावताना त्यांना फोन कुणी केले? कुणाच्या सांगण्यावरून ते हॉटेल सनीला आले? यासाठी त्यांचे सीडीआर पोलिसांनी तपासायला हवेत. सनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे अद्यापही आले नाही. हे प्रकरण उघडकीस आणणार्‍या पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे-खराडे यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Back to top button