वरिष्ठ पोलिस अधिकारी सुजाता पाटील यांना लाच घेताना अटक | पुढारी

वरिष्ठ पोलिस अधिकारी सुजाता पाटील यांना लाच घेताना अटक

मुबंई, पुढारी ऑनलाईन

बदलीसाठी आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर चर्चेत आलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकारी सुजाता पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली. त्या सध्या मुंबईतील मेघवाडी विभागाचया सहायक पोलिस आयुक्त आहेत. एसीबीने त्यांच्या कार्यालयात सापळा रचून त्यांना एक लाख रुपयांची मागणी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

सुजाता पाटील यांनी तक्रारदाराकडे एक लाखांची लाच मागितली होती. त्यापैकी ४० हजारांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडले.
पाटील या हिंगोली येथे नियुक्तीस असताना त्यांना बदली हवी होती. मात्र, ती होत नसल्यने त्यांनी एक तर बदली किंवा आत्महत्या असे दोनच पर्याय माझ्यापुढे आहेत, असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले.

त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या पत्राची खूप चर्चा झाली होती. या पत्रात त्यांनी माझे कुटुंब मुंबईत राहते. माझी मुलगी कॉलेजसाठी मुंबईत आहे. त्यामुळे तेथील खर्च आणि हिंगोलीतील खर्च मला परवडत नाही. त्यामुळे बदली करावी अशी मागणी केली होती. पाटील या हिंगोलीत पोलिस उपअधीक्षक होत्या.

सुजाता पाटील अटक : कोठडीत मृत आरोपीची मुलगी घेतली होती दत्तक

सांगली पोलिसांनी कोठडीत मारहाण केलेल्या अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या मुलीला पाटील यांनी दत्तक घेतले होते. दत्तक घेतलेली तीन वर्षांची मुलगी आणि त्यांची १७ वर्षांची मुलगी मुंबईत असतात, त्यांना एकटे सोडून मी हिंगोलीत नोकरी करते, असेही त्यांनी पत्रात लिहिले होते. जर माझी बदली मुंबईला करता येत नसेल तर गडचिरोलीला करावी, जेणेकरून नक्षलवाद्यांशी लढताना मरण आले तर शहिदांना मिळणारे फायदे तरी माझ्या कुटुंबाला मिळतील, असे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले होते.

हेही वाचा :

Back to top button