पालघर जि.प.पोटनिवडणुकीत डहाणू तालुक्यातील वणई गटातून शिवसेनेचे रोहित राजेंद्र गावीत यांना पक्षाने उमेदवारी जाहीर करून एक नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या प्रयत्नात खासदार राजेंद्र गावीत यांचे चिरंजीव रोहित गावीत यांना तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या गटात भाजपचे पंकज कोरे यांनी 3654 मते मिळवत विजय मिळविला आहे. काँग्रेसच्या वर्षा वायेडा 3242, तर रोहित गावीत यांना 2356 मते मिळाली.
वणई गटामध्ये यापूर्वी शिवसेनेचे माजी कृषी आणि पशुसंवर्धन सभापती सुशील चुरी निवडून आले होते. मात्र, त्यांनाही आरक्षणाच्या मुदद्यावरून पायउतार व्हावे लागले होते. यावेळी चुरी यांना त्याच ठिकाणी उमेदवार मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, खासदार राजेंद्र गावीत यांनी आपल्या मुलासाठी या जागेसाठी आग्रही राहिले.
रोहित गावीत यांची उमेदवारी पक्षनेतृत्वाने घोषित केली होती. या ठिकाणी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी या भागात प्रचारसभाही घेतली होती. सर्व कार्यकर्त्यांनाही या विजयासाठी कंबर कसून काम करा, असा आदेश देण्यात आला असतानाही या जागी प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपानेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या ठिकाणी सुद्धा भाजपचे नेते कपिल पाटीलसुद्धा प्रचारात सक्रिय झाले होते.
डहाणू तालुक्यातील बोर्डी गटातून भाजपच्या ज्योती प्रशांत पाटील निवडून आल्या. कासा गटातून राष्ट्रवादीच्या लतिका लहू बालशी 5312 मते घेवून विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सुनीता किरण कामडी यांचा पराभव केला. कामडी यांना 2725, कामिनी त्र्यंबक शिंदे (भाजप)1687, मनीषा यतीन नम (काँग्रेस) 891, तर नोटा 375 मिळाली. बालशी यांना 2587 चे मताधिक्य मिळाले.
मोखाडा आसे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत हबीब शेख, तर तर पोशेरा येथून शिवसेनेच्या मोखाडा तालुका विद्यमान सभापती सारिका निकम विजयी झाल्या आहेत. निकम यांची जिल्हा परिषदेवर वर्णी लागल्याने त्यांची पंचायत समितीची जागा आता रिक्त होणार आहे. त्या जागी पुन्हा निवडणूक होणार आहे.
वसई तालुक्यात बहुजन विकास आघाडीने आपला झेंडा रोवला असून शिवसेनेला धक्का दिला आहे. या दोन पंचायत समित्यांच्या जागेवर शिवसेना कार्यरत होती. बोर्डी गटामध्ये भाजपच्या ज्योती प्रशांत पाटील 5283 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या उन्नती सतेश राउत यांचा 416 मतांनी पराभव केला आहे. राउत यांना 4867, बविआच्या निवेदिता बारी 999, तर 423 जणांनी उमेदवारांना नाकारले आहे. या जिल्हा परिषदेत त्यांनी यापूर्वी आपले प्रतिनिधित्व केले होते. पक्षाने त्यांना पुन्हा संधी देवून निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना ही जागा गमवावी लागली होती. भाजपने पुन्हा एकदा या जागेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.