Ichalkaranji Crime : इचलकरंजीतील शहापूर बसस्थानकावर दगडफेक, ८ बसेस फोडल्या | पुढारी

Ichalkaranji Crime : इचलकरंजीतील शहापूर बसस्थानकावर दगडफेक, ८ बसेस फोडल्या

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

Ichalkaranji Crime : एसटीच्या धडकेत गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांसह जमावाने राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजीतील शहापूर एस.टी. आगारात धुडगूस घातला. दगडफेक करत तब्बल ८ एसटीचे नुकसान केले. त्याचबरोबर पाच मोटरसायकलींची तोडफोड केली. आगार परिसरात दगडांचा खच पडला होता. सुरक्षारक्षकासह चालक-वाहक अशा चौघांना धारदार शस्त्रा, काठ्या, दगड, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाणही केली.

Ichalkaranji Crime : दोघांना पोलिसांच्या हवाली

सुरक्षारक्षक सुरेश शिवाजी केसरकर, स्वच्छता रक्षक पांडुरंग आण्णाप्पा चव्हाण, जत आगारातील चालक नवनाथ सिताराम हिप्परकर व कागल आगारातील चालक कृष्णा सदाशिव चोपडे अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, हल्लेखोरांपैकी दोघांना कर्मचार्‍यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

तीन दिवसांपूर्वी येथील वर्धमान चौकात एसटी आणि दुचाकीचा अपघात झाला होता. त्यामध्ये दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले होते. त्यांच्यावर प्राथमीक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. त्यातील एका जखमीचे उपचार सुरु असताना मंगळवारी मृत्यू झाला.

जमावाची तुफान दगडफेक

या कारणावरुन संतप्त जमावाने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहापूर परिसरातील एसटी आगाराला लक्ष्य केले. जमावाने आगारात प्रवेश करताना तेथील सुरक्षारक्षक सुरेश केसरकर यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता जमावाने त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावाने आगारात उभ्या असलेल्या एसटीवर तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली.

त्यामध्ये इचलकरंजी, कागल, चंदगड, जत आदी आगाराच्या सात एसटी आणि संभाजीनगर आगाराच्या मालवाहतूक एसटीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक घडलेल्या घटनेने तेथे वस्तीला असलेले चालक-वाहक बाहेर आले असता जमावाने त्यांच्यावर हल्ला करत दगडफेक करण्यासह बेदम मारहाण केली.

कर्मचाऱ्यांच्या पाच मोटरसायकली फोडल्या

तसेच कर्मचार्‍यांच्या पाच मोटरसायकलींवर दगड टाकत तोडफोड केली. यावेळी एसटी आगारातील कर्मचार्‍यांनी धाडसाने जमावातील एकाला पकडले. ही घटना समजल्यानंतर जमावातील आणखीन काहीजण दहशत माजवत आगारात आले. पकडलेल्या हल्लेखोरास सोडविण्यासाठी पुन्हा धुडगूस घातला. त्यातील एका हल्लेखोराला कर्मचार्‍यांनी पकडले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहापूर पोलिस आगारात आले. त्यांनी संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले. एसटी आगारप्रमुख संतोष बोगार आणि अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत एसटीचे तब्बल लाख रुपयाचे तर बसेस मार्ग बंद राहिल्याने दीड लाख असे एकूण अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसात तक्रार देण्याचे काम सुरु आहे.

Back to top button