बेंबळे; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण अवलंबून असलेले उजनी धरण संथ गतीने का होईना अखेर 99.75 टक्के भरले. तर दौंड येथून 6034 क्युसेक्स विसर्ग उजनीत येत आहे. त्यामुळे उजनीचा शंभरीचा पल्ला गाठला आहे. आज सकाळपर्यंत उजनी 100 टक्के भरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या बरोबर उद्योग धंदे, कारखानदार, व उजनीवर पिण्याचे पाणी अवलंबून असणाऱ्या सोलापूरसह छोट्या मोठ्या शहरांतील नागरिकांचा, गावकऱ्यांचा जीव भांड्यांत पडला आहे. उजनी धरणांच्या वाढत्या पाणीसाठ्याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे उजनीत पाणीसाठा वाढला असून तर उजनी धरणात दौंड येथून विसर्गातही घट झाली होती. त्यात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. तो काल सायंकाळी 6034 क्युसेक्स झाला आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे उजनी धरणात उशिरा का होईना पाणीसाठा 100 टक्के झाला आहे.
एकूण पाणीपातळी ….496.810 मी.
एकूण पाणीसाठा …3310.93दलघमी
TMC मध्ये 116.89
उपयुक्त पाणीसाठा …1510.32
TMC मध्ये 53.32
टक्केवारी …99.75 %
उजनीत येणारा विसर्ग
दौंड ….6034
बंडगार्डन ..4359
2019 या वर्षी उजनी 27 ऑगस्टला 100 टक्के भरले होते. तर 2020 वर्षी उजनी 6 ऑगस्ट रोजी 100 टक्के झाले होते. मात्र या वर्षी गेल्यावर्षी पेक्षा जवळपास दोन महिने उशिरा उजनी धरण 100 टक्के झाले आहे. उजनीची निर्मिती झाल्यापासून म्हणजे गेल्या 41 वर्षात 32 वेळा 100 टक्के धरणे भरले गेले. उजनीचे जलसंपदाशास्त्र उगम क्षेत्रातील पावसावर अवलंबून आहे. म्हणजे उजनीवरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. त्या धरणातून आलेल्या पाण्यामुळे धरण भरले जाते. पण 2009 मध्ये केवळ उजनी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसावर उशीरा का होईना धरण 100 टक्के झाले होते. त्यावेळी वरील धरणातून उजनी धरणात एक थेंबही पाणी आले नव्हते .
उजनी धरणाच्या परिक्षेत्रात 500 मिमी पाऊस व भीमा नदी उगम परिसरातील 19 धरणे व त्यावरील 4320 मिमी पावसाच्या अवलंबतेवर उजनीचे जलसंपदा शास्त्र निर्माण केले आहे. उजनी धरण हे महाराष्ट्रातील उपयुक्त साठ्याबाबत जायकवाडी व कोयना धरणानंतर सर्वात मोठे धरण असून, मृत साठ्यात मात्र महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता 3320 दलघमी (123 टीएमसी) तर उपयुक्त पाणी साठवण क्षमता 1517.19 द.ल.घ.मी. व मृत पाणी साठवण क्षमता 1802.81 द.ल.घ.मी., उपयुक्त पाणी साठ्यापेक्षा (53.57टीएमसी) मृतसाठा (63.65 टीएमसी) मोठा असलेले उजनी हे महाराष्ट्रातील एकमेव धरण आहे.
या धरणाचेपाणलोट क्षेत्र हे 14856 चौ. कि,मी. आहेत.
उजनी धरणाच्या निर्मितीनंतर त्या पाण्याद्वारे जवळजवळ 3 लाख 97 हजार 800 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
उजनी धरणाद्वारे सोलापूर पुणे अ. नगर जिल्ह्यातील लाखो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येवून हा भाग सुजलाम सुफलाम झाला आहे. या जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष उजनी धरणातील पाणीसाठ्याकडे लागलेले असते. "जल है तो कल है" या म्हणीप्रमाणे यातील पाणी आपल्या भागाला कसे मिळेल याकडे त्या त्या भागातील आमदार, खासदार, मंत्री, नेते, आपपाल्यापरीने प्रयत्न करताना अनेकवेळा खालच्या पातळीचे सोयीचे राजकारण करताना दिसत आहे.
म्हणजेच उजनी आणि उजनीतील पाणी एक राजकारणाचा, मतदाराला आकर्षित करण्याचा विषय झाला आहे. पाणी सोडल्यानंतर त्याच्या श्रेयावर राजकारण झालेले संपूर्ण जिल्ह्यांने अनेकवेळा अनुभवलेले आहे. त्यामुळे उजनी धरण एक राजकीय विषय झाला आहे.
पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील धरणे पूर्ण भरली आहेत. सध्या दौंड येथून क्युसेक्स पाण्याचा प्रवाह उजनीत येत आहे. धरण शंभर टक्के भरण्याच्या अवस्थेत आल्याने वरून येणारा विसर्गचा विचार करून पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापन घेणार आहे.
धीरज साळे, अधिक्षक अभियंता, उजनी