महाड; पुढारी वृत्तसेवा: कोकण रेल्वेचे महाव्यवस्थापक व डायरेक्ट संजय गुप्ता यांनी आज महाडमधील कोकण रेल्वेच्या संदर्भात झालेल्या तक्रारीबाबत भेट दिली. या दरम्यान त्यांनी दादली ते बाणकोट परिसरात विविध ठिकाणच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यासोबत चर्चा केली आहे.
जुलै महिन्यात महाडमध्ये आलेल्या महाप्रलयाला कोकण रेल्वेचा दासगाव जवळील पूल व शेजारचा भराव कारणीभूत असल्याचा आरोप महाड पूर निवारण समितीने केला होता.
या संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी कोकण रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय गुप्ता यांच्याबरोबर चर्चा करून प्रत्यक्ष भेट देण्याची सूचना केली होती.
यानुसार कोकण रेल्वेच्या उच्चपदस्थ तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी (दि.१) रोजी महाव्यवस्थापक संजय गुप्ता यांनी कोकण रेल्वेच्या महाड परिसरात भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
काही दिवसांपूर्वी महाड येथे झालेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हाधिकारी व रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत दासगाव पुलाजवळ जाऊन पाहणी करुन महाडकरांच्या असलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेण्याची सूचना केली होती. या अनुषंगाने आजची ही भेट असल्याची माहिती संजय गुप्ता यांनी दिली आहे.
या दौऱ्यात महाडच्या प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांची या विषयासाठी नोडल ऑफिसर म्हणून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी नियुक्ती केली आहे. या समितीच्या संबंधित भेटीपूर्वीची रेल्वे प्रशासनाची ही स्वतंत्र भेट असल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचलंत का?