औरंगाबाद : सिल्‍लोडात पावसामुळे दाणादाण, शेतीच गेली खरडून | पुढारी

औरंगाबाद : सिल्‍लोडात पावसामुळे दाणादाण, शेतीच गेली खरडून

सिल्लोड; पुढारी वृत्तसेवा : सिल्‍लोडात पावसामुळे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. नद्यांना आलेल्या पुरात कोल्हापुरी बंधारे, स्मशानभूमी, पूल, रस्ते वाहून गेले. तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून, पूल वाहून गेल्याने जाण्यायेण्याचे मार्गच बंद झाले आहेत. या पावसामुळे शेतीसह शासकीय मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ५० हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली असून ३४ कोटींचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीची तीव्रता पाहता सिल्‍लोडात पावसामुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्‍याचे समोर आले आहे.

उपळी गावाशेजारील अंजना नदीवरील पूल वाहून गेला

तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडाली. या पावसात पूर्णा, अंजना, खेळणा नद्यांना मोठा पूर आला, तर ग्रामीण भागातील नद्या दुथडी भरुन वाहिल्या.

यात उपळी गावाशेजारील अंजना नदीवरील पूल वाहून गेला. शिवाय कोल्हापुरी बंधारा वाहून गेल्याने जाण्यायेण्याचा मार्गच बंद झाला आहे.

उपळीकरांना आता २० कि. मी. वळसा घालून भराडीला जावे लागत आहे.

तर शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालत पाण्यातून शेतात जावे लागत आहे. उंडणगाव जवळील जुई नदीवरील पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प आहे.

लुक्यातील रहिमाबाद व धानोरा येथील स्मशानभूमी वाहून गेली आहे.

पूर्णा नदीवरील काकडेवाडी जवळील एक बाजू वाहून गेलेला कोल्हापुरी बंधारा आता पूर्णतः वाहून गेला आहे.

चिंचखेडा येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची एक बाजू वाहून गेल्याने शेजारील शेतकऱ्यांची शेती खरडून गेली. कोल्हापुरी बंधारे वाहून गेल्याने लाखो लीटर पाणी वाहून जाणार आहे.

या पावसात पळशी- लोणवाडी- म्हसला, उपळी- दीडगाव- भराडी, सारोळा- औरंगाबाद- जळगाव महामार्ग, हट्टी- हट्टी फाटा, अंभई- पिंपळगाव घाट, अंभई- सिरसाळा, अन्वी- रहिमाबाद- आसडी, उंडणगाव- मोहळ, उंडणगाव- खंडाळा, आमठाणा- देऊळगाव बाजार अशा अनेक रस्त्यांना जागोजागी खड्डे पडले आहे.

उपळी येथील पूल तीन वर्षात दुसऱ्यांदा वाहून गेला आहे. २०१९ मध्ये हा पूल वाहून गेला होता.

गेल्या वर्षीच या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. मुसळधार पावसाने शेतीसह पूल, रस्ते अशा शासकीय मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे.

६६ घरांची पडझड

मुसळधार पावसात तालुक्यातील ६६ घरांची पडझड झाली आहे. यात के-हाळा, कायगाव, अंधारी, खुल्लोड, बहुली, धामणी, अंभई, भवन, चारनेर, धारला- धावडा या गावातील घरांचा समावेश आहे.

आता प्रशासनाकडून नुकसानीचे युध्दपातळीवर पंचनामे सुरु असून मोठ्या शासकीय मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

Back to top button