वासिम जाफरची स्मृती मानधनाला देवीची उपमा | पुढारी

वासिम जाफरची स्मृती मानधनाला देवीची उपमा

क्विन्सलँड : पुढारी ऑनलाईन

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघातील पहिल्या वहिल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात स्मृती मानधाने धडाकेबाज शतक ठोकले. विशेष म्हणजे कसोटीमधील तिचे हे पहिलेच शतक आहे. त्याहून भारी गोष्ट म्हणजे स्मृती मानधना पिंक बॉल कसोटी सामन्यात शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. या ऐतिहासिक शतकानंतर स्मृती मानधनावर क्रिकेट वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. सोशल मीडियावर अनेक माजी खेळाडूंनी तिच्या शतकाचे कौतुक केले. मात्र यात वासिम जाफरने केलेले कौतुक विशेष आहे. त्याने स्मृतीला क्रिकेटमधील देवीचीच उपमा दिली.

स्मृतीने कसोटीच्या पहिल्याच दिवशी ८० धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र पावसाने स्मृतीच्या पहिल्या वहिल्या शतकाची प्रतिक्षा वाढवली. पहिल्या दिवसाचा बराचसा खेळ वाया गेल्यामुळे स्मृतीला शतकासाठी दुसऱ्या दिवसाची वाट पहावी लागली. अखेर आज कसोटीच्या दुसऱ्या दिवशी तिने आपले शतक पूर्ण केले.

गॉडेस ऑफ ऑफ साईड

स्मृती मानधनाचे ऐतिहासिक शतक पूर्ण झाल्यानंतर क्रिकेट जगतातील दिग्गज व्यक्तींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफरने ट्विट केले की, ‘उजव्या बाजूची देवी! पहिल्या कसोटी शतकाबद्दल अभिनंदन स्मृती मानधना. अनेक शतकामधील पहिले शतक छान खेळलीस.’

जाफर बरोबरच भारतीय महिला संघाची माजी कर्णधार आणि समालोचक अंजुम चोप्रानेही मानधनाचे अभिनंदन केले. ‘एक साधे सेलिब्रेशन. स्मृती मानधनाने आपल्या कसोटी कारकिर्दितील पहिले शतक ठोकले.’ असे ट्विट चोप्राने केले.

क्रिकेट समालोचक आणि माजी सलामीवीर आकाश चोप्रानेही स्मृती मानधनाचे ट्विट करुन अभिनंदन केले. त्याने ‘पहिले कसोटी शतक. नक्कीच यापुढेही अनेक शतके तुझ्या बॅटमधून येतील. छान खेळलीस स्मृती मानधना. मोठा शंभर कर.’ असे ट्विट करत शतकानंतरही मोठी खेळी करण्याचा सल्ला दिला.

स्मृतेनही शतकानंतर आपण समाधानी झालो नसल्याचे दाखवून दिले. ती मोठ्या खेळीच्या पवित्र्यात होता मात्र १२७ धावांवर ती बाद झाली. ती जरी बाद झाली असली तरी स्मृतीने आपल्या शतकाच्या जोरावर भारताला चांगली सुरुवात करुन दिली. डिनर टाईमसाठी खेळ थांबला त्यावेळी भारताने आपला २०० धावांचा टप्पा पार केला होता.

हेही वाचले का?

Back to top button